रमबीर सिंग यांनी ते पत्रच लिहिले नसते तर त्यांनी पोलिस सेवेत असतानाही गृहमंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराची सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल का केली असती याचे उत्तर शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या केलेल्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप होत आहेत. परमबीर सिमग यांनी देशमुखांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहेत. याचं पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मुंबईचे माजी पोलीस माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी वकीली करणारे व त्यांची सातत्याने पाठराखण करणारे शरद पवार यांनी आता तरी महाराष्ट्राची बेअब्रू रोखावी व त्यांच्या आरोपांचे उत्तर देऊन तात्काळ अनिल देशमुख यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

    दरम्यान गृहमंत्री देशमुख यांच्यावर १०० कोटीची खंडणी गोळा करण्याचे आरोप केल्यानंतर हे सर्व आरोप कसे चुकीचे आहेत. ते पत्रच खोटे आहे, पत्रावर शंका व्यक्त होत आहे व त्या पत्रातील नोंदीनुसार सचिन वाझे व गृहमंत्री देशमुख यांची भेटच झाली नसल्याचे तारखांचे दाखले पवारांनी तातडीने दिल्याचे निदर्शनास आणून देतानाच चंद्रकात पाटील म्हणाले की, जर परमबीर सिंग यांनी ते पत्रच लिहिले नसते तर त्यांनी पोलिस सेवेत असतानाही गृहमंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराची सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल का केली असती याचे उत्तर शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे. विशेष म्हणजे पुरावे नष्ट करण्याआधीच गृहमंत्री देशमुख यांच्याविरोधात खंडणी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशीची मागणी परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केली असेल तर न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका सुध्दा खोटी आहे का असा सवालही चंद्रकात पाटीलांनी उपस्थित केला.

    दोन दिवस होऊनही महाराष्ट्राच्या अब्रुचे धिंडवडे काढणा-या या गंभीर पत्राच्या चौकशीचे साधे आदेश अद्यापही महाविकास आघाडी सरकारने दिलेले नाहीत. विशेष म्हणजे परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब मध्ये शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. ज्या अर्थी पवार यांनी याबाबत कुठेही इन्कार केला नाही त्या अर्थी या पत्रामध्ये तथ्य असल्याचे सिध्द होत आहे. मग सत्तेच्या लालसे पोटी पवार या प्रकरणात नक्की कोणाच्या कृष्णकृत्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असंही पाटील म्हणाले.