केवळ हिंदूच्या सणाच्या वेळीच तिसऱ्या, चौथ्या लाटा हा काय समुद्र आहे का?; राज ठाकरे बरसले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कृष्णकुंज येथे माध्यमांशी बोलताना कोविड-१९ च्या निर्बंधावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. करोनाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या लाटा हा काय समुद्र आहे का? असे खास शैलीत विचारणा करत त्यांनी शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील यात्रा आणि राड्याला निर्बंधाची आडकाठी का आली नाही आणि ती केवळ हिंदूच्या सणाच्या वेळीच जाणीवपूर्वक का आणली जात आहे असा, सवाल केला.

  मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कृष्णकुंज येथे माध्यमांशी बोलताना कोविड-१९ च्या निर्बंधावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. करोनाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या लाटा हा काय समुद्र आहे का? असे खास शैलीत विचारणा करत त्यांनी शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील यात्रा आणि राड्याला निर्बंधाची आडकाठी का आली नाही आणि ती केवळ हिंदूच्या सणाच्या वेळीच जाणीवपूर्वक का आणली जात आहे असा, सवाल केला. सरकारने मंदिरे उघडली नाहीत तर मनसे घंटानाद आंदोलन करणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

  निर्बंधाचा फायदा घेऊन हजारो कोटींची कामे

  माध्यमांशी बोलताना ठालरे म्हणाले की, पी साईनाथ यांचे एक पुस्तक आहे त्याचे नाव दुष्काळ आवडे सर्वाना असे आहे तसेच या सरकारमध्ये लॉकडाऊन आवडे सरकारला असे दिसत आहे. ते म्हणाले की निर्बंधाचा फायदा घेऊन हजारो कोटींची कामे वाजवली जातात. त्या विरोधात कोणी काही बोलू नये, मोर्चे काढू नये, सभा घेऊ नये म्हणून कोरोनाच्या लाटा आणल्या जात आहेत. लाटा यायला काही समुद्र आहे का? विनाकारण इमारती सील करायच्या. याआधी देशात काही रोगराई आलीच नव्हती का?,’ असे सवाल त्यांनी केले.

  महापौर बंगल्या बाहेर बिल्डरांच्या गाड्यांची गर्दी

  राज ठाकरे म्हणाले की, मैदानांवर फुटबॉल, क्रिकेट सुरू आहे. सध्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी हडपण्यात आलेल्या जुन्या महापौर बंगल्या बाहेर बिल्डरांच्या गाड्यांची गर्दी असते, कुठेच काही बंद नाही. सगळे काही सुरू आहे. राजकीय पक्षांचे मेळावे सुरू आहेत. जन आशीर्वाद यात्रा सुरू आहेत. त्यावरून भाजप आणि शिवसेनेच्या लोकांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत. त्यांच्यासाठी निर्बंध का नाहीत. फक्त दहीहंडी किंवा सण-उत्सव आले की निर्बंध का लागतो. सणांमधूनच करोना पसरतो का?,’ असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला.

  अचानक निवडणुकांच्या घोषित करतील

  ते म्हणाले की सरकारच्या सोयीने यांना जेवढे हवे आहे, तेवढे चालवायचे. बाकीच्यांना बंद करून आणि जनतेला घाबरवून ठेवायचे. यांची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष ? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्याचे नाव न घेता विचारला. ते म्हणाले की आता हे बंद म्हणतील आणि अचानक निवडणुकांच्या घोषणा करतील म्हणजे बाकीचे पक्ष तोंडावर पडतील. त्यामुळे दहीहंडीसह सगळे सण दणक्यात साजरा करण्याचा निर्णय मनसेच्या कार्यकर्त्याना घेण्यास आदेश दिले. त्यामुळे केस किती लागतील ते बघू. असेही राज ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, मनसेच्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले जात आहेत. पण आम्हाला काही फरक पडत नाही. शिवसेना विरोधी पक्षात असती तर त्यांनी काय केले असते,’ असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

  इकडे लोकांना कशाला घाबरवता

  निर्बंधाना विरोध करणाऱ्यांना राज्य सरकार लंडन, अमेरिकेची उदाहरणे का देत आहे. ‘अमेरिकेत काही होत असेल तर ते बघून घेतील. तुम्ही इकडे लोकांना कशाला घाबरवता?,’ असेही त्यांनी मुख्यमंत्र्याचे नाव न घेता विचारले.. नियम लावायचा आहे तर सगळ्यांना एक नियम लावा. एकासाठी वेगळा, दुसऱ्यासाठी वेगळा असे चालणार नाही असे राज ठाकरे म्हणाले.