मुंबई बदलतांना पाहणे आनंददायी वाटते; एमएमआरडीएच्या मेट्रोसेवेच्या चाचणीचे मुख्यमंत्र्यानी केले उद्घाटन

मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरानाविषयक बंधने आपण उठवलेली नाहीत. मुंबईत गर्दी पाहताना मला चिंता वाटते. कोरोनाचा धोका टळलेला नाही. अशीच गर्दी होत राहिली तर संथ गतीने सुरु करत असलेल्या आपल्या हालचालींना ब्रेक लागेल. मुंबईत अशीच गर्दी राहिली तर मुंबईत सुद्धा कडक बंधने लावावी लागतील असे ते म्हणाले.

  मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज एमएमआरडीएच्या मेट्रोसेवेच्या चाचणीचे उदघाटन केले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महापौर किशोरी पेडणेकर आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, ज्या मुंबईत जन्मलो ती मुंबई बदलतांना पाहणे आनंददायी वाटते. ते म्हणाले की, काम होतात, रस्ते होतात, मेट्रो होते पण तुमचे काम मी कलाकाराच्या नजरेतून बघतो तेंव्हा ते अगदी आखीव रेखीव आणि देखण आहे. मेट्रो स्टेशन, मेट्रो कोच देखणे, हे कोच आपल्या देशात बनवले यावर विश्वास बसत नाही.

  महाराष्ट्रातील जनतेचे हे श्रेय

  ते म्हणाले की सध्या ऑनलाईन मिटींग सुरु. कोविड केअर, चाचणी केंद्र, ऑक्सीजनचे प्लांट ओपन करतो आहोत. मागील काही कालावधीपासून असेच कार्यक्रम आपण करत आहोत पण मेट्रोच्या प्रवासात मुख्यमंत्री म्हणून सहभागी होता आले हे भाग्य आहे. मेट्रोचे हे सांघिक यश आहे. अहिल्याबाईंनी संतपरंपरेने दिलेला वारसा पुढे नेण्याचे काम जरी आपण करू शकलो तरी महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील. मुख्यमंत्री म्हणाले की, नेतृत्व माझ्याकडे असले तरी हे कर्तृत्व माझ्या टीमचे आहे. प्रशासकीय सहकारी आणि महाराष्ट्रातील जनतेचे हे श्रेय असल्याने कोणतेही श्रेय हे एकट्या कॅप्टनचे कधीच नसते असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, शहराला दिशा आणि वेग देणारा हा कार्यक्रम आहे. रस्त्यांचा एफएसआर वाढवता येत नाही. उड्डाणपूल आणि रस्त्यावर रस्ते बांधतो आहोत तरी विकास आणि वेग आपण कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे.

  आहे त्याकडे आपले लक्ष नसते

  मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वी गच्चीत उभे राहिलो तर चौफेर खाडी आणि कांदळवन दिसायचे. आताच्या दिसणाऱ्या इमारती नव्हत्या. आता कांदळवन शोधावे लागते. चटईक्षेत्र म्हणजे ऊंच इमारती, त्यांच्या पाण्याची, सांडपाण्याची व्यवस्था, जनतेच्या येण्या जाण्याची सोय कशी करायची हा प्रश्न. तरीही मेट्रोच्या या प्रकल्पाने नव्या पिढीला आणि नव्या विचारांना पुस्तकात नाही तर प्रत्यक्षात आणून दाखवले. नवीन घडवत असतांना आहे त्याकडे आपले लक्ष नसते. मुंबईत शिलालेख, दगडीशिल्प गुंफा आहे किल्ले आहेत त्यावरही लक्ष द्यायला हवे असे ते म्हणाले.

  मुंबईत सुद्धा कडक बंधने लावावी लागतील

  मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरानाविषयक बंधने आपण उठवलेली नाहीत. मुंबईत गर्दी पाहताना मला चिंता वाटते. कोरोनाचा धोका टळलेला नाही. अशीच गर्दी होत राहिली तर संथ गतीने सुरु करत असलेल्या आपल्या हालचालींना ब्रेक लागेल. मुंबईत अशीच गर्दी राहिली तर मुंबईत सुद्धा कडक बंधने लावावी लागतील असे ते म्हणाले.