गाफील राहिलो तर संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला रोखणे अशक्य; लसीकरणाचा वेग महत्वाचा : मुख्यमंत्र्याचे जिल्हाधिका-यांना स्पष्ट निर्देश!

कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यायला हवी. आज ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्सची गरज आहे तिथे आवश्यक त्या परवानग्या दिल्या आहेत, नसतील तर तात्काळ देण्यात येत आहेत मात्र कोणत्याही परिस्थितीत येत्या काळात पुरेसा ऑक्सिजन रुग्णांसाठी उपलब्ध राहील याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावयाची आहे व यासाठी कोणतेही कारण चालणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले.

    मुंबई : राज्यातील कोविड-१९ उपाय योजनां बाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्याशी काल सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिका-यांना प्रत्यक्षात परिणाम दिसेल असे काम करण्याच्या सूचना दिल्या. राज्यात कोरोना वरील उपाय योजना त्याच सोबत टाळेबंदीचे निर्बंध लागू असल्याने निर्माण झालेल्या स्थिती करावयाच्या उपाययोजना याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यानी अधिका-यांना निर्देश दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, गाफील राहिलो तर संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला रोखणे अशक्य होणार असल्याने लसीकरणाचा वेग महत्वाचा आहे. त्यासाठी पुरेशा प्रमाणात व वेळेवर लस पुरवठा आवश्यक आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली असून लसपुरवठ्यावर नियोजन केले जात आहे. जिल्ह्यांमध्ये याबाबत अंमलबजावणी व्यवस्थित पार पाडावी लागणार  असल्याची सूचना त्यांनी केली.

    कंटेनमेंट झोन करून टाळेबंदी निर्बंध
    कोरोना उपाय योजना करताना काही भागात अतिसंवेदनशील स्थिती दिसून आली तर त्या भागात कंटेनमेंट झोन करून टाळेबंदी निर्बंध लावण्याबाबत वेळीच काळजी घेण्यात यावी असे करताना कोणत्याही परिस्थितीत अत्यावश्यक सेवा आणि महत्वाचे औद्योगिक व्यवसाय अडचणीत येणार नाहीत याची दखल घेण्याची सूचनाही त्यानी केली.
     
    अतिशय सावध राहून नियोजन करा
    कोविड परिस्थितीसंदर्भात राज्यातील कडक निर्बंधांमुळे काही प्रमाणात रुग्णसंख्या स्थिरावली असली तरी आपल्याला आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कडक निर्बंध लावल्यानंतर लगेच रुग्णसंख्या कमी होते असे नाही. तरी देखील वेळेत कडक निर्बंध लावल्याने अंदाजित मोठी रुग्णवाढ आपण रोखू शकलो, असे नमूद करताना निर्बंधांच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनांना दिल्या.

    परप्रांतीय मजूरांची चाचणी महत्वाची
    गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत गेले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी जे प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत धोरण ठरवता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    औषधे-ऑक्सिजन साठा लक्ष द्या
    कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यायला हवी. आज ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्सची गरज आहे तिथे आवश्यक त्या परवानग्या दिल्या आहेत, नसतील तर तात्काळ देण्यात येत आहेत मात्र कोणत्याही परिस्थितीत येत्या काळात पुरेसा ऑक्सिजन रुग्णांसाठी उपलब्ध राहील याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावयाची आहे व यासाठी कोणतेही कारण चालणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून आवश्यक त्या औषधांचा साठा आतापासून करून ठेवा. यासंदर्भात राज्यातील टास्क फोर्सचे डॉक्टर्स मार्गदर्शन करीत आहेतच. योग्य ती औषधे योग्य त्या प्रमाणात देण्यासाठी उपचार पद्धतीबाबत टास्क फोर्सचे डॉक्टर्स कायम उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातल्या डॉक्टर्सनी सुद्धा त्यांच्या अडीअडचणी या तज्ञ डॉक्टर्सना मनमोकळेपणाने विचारणे गरजेचे आहे. येणाऱ्या पावसाळ्यातल्या आपत्ती लक्षात घेता आवश्यक औषधी व संसाधनांचा साठा जिल्ह्यातील अगदी कानाकोपऱ्यात होईल याचेही चांगले नियोजन करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    अग्नीसुरक्षा, ऑडिट महत्वाचे
    यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, शशांक जोशी, राहुल पंडित, डॉ. तात्याराव लहाने यांनी देखील आपले विचार मांडले. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काळजीपूर्वक काम करावे तसेच विशेषतः रुग्णालयांतील अग्नीसुरक्षा, बांधकाम आणि विद्युत उपकरणांचे ऑडिट तात्काळ पूर्ण करून अहवाल देण्याचे निर्देश दिले. प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास आणि प्रधान सचिव विजय सौरव यांनी देखील बैठकीत सद्यस्थितीची माहिती दिली.