देर आये, मगर दुरस्त आये, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारावा : प्रविण दरेकर

न्यायालयाच्या आदेशाने गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी सीबीआय करणार असल्याने अखेर त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रविण दरेकर म्हणाले की, 'माननीय उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

  मुंबई : राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. असे असले तरी देर आये मगर दुरुस्त आये, आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारावा तसेच सचिन वाझे काय ओसामा बिन लादेन आहे का, असा प्रश्न विचारणाऱ्या  मुख्यमंत्र्यांचे आता वाझे प्रकरणी काय मत आहे, हेही त्यांनी स्पष्ट करावे, अशी खोचक प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर दिली.

  उशीरा सुचलेलं शहाणपण

  न्यायालयाच्या आदेशाने गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी सीबीआय करणार असल्याने अखेर त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रविण दरेकर म्हणाले की, ‘माननीय उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. डॉ.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर “१५ दिवसांच्या आत सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर करावा”, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने  सीबीआयला आदेश दिले आहेत. माननीय उच्च न्यायालयाने अतिशय कठोर पाऊल उचलले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, या आदेशानंतर गृह मंत्र्यांनी राजीनामा देणे हे “उशीरा सुचलेल शहाणपण आहे.”

  आता पितळ उघडे पडेल

  खरे तर परमबीर सिंग यांनी लिखित आरोप केल्यानंतर लगेच गृह मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणे अपेक्षित होते.  पण तसे झाले नाही.  आता पितळ उघडे पडेल, या भीतीपोटी राजीनामा देण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, असा आरोप दरेकर यांनी केला. आम्ही पहिल्या दिवसापासून राजीनाम्याची मागणी करत होतो. महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणाऱ्या या कार्यकाळाचे सत्य बाहेर येईल. सीबीआय चौकशीत कशाप्रकारे हप्ताखोरी चालली होती ते देखील बाहेर येईल. काही लोकांनी सीबीआय चौकशी होऊ नये याकरता प्रयत्न केले.

  सत्यता जनते समोर येणे अपेक्षित

  रश्मी शुक्लांचा अहवाल, परमबीर सिंग यांचे पत्र या गोष्टी कशा चुकीच्या आहेत हे भासवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला माननीय उच्च न्यायालयाने जोरदार उत्तर दिले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन ह्या प्रकरणाची सत्यता जनते समोर येणे अपेक्षित होते. परंतु या सरकारच्या बाबतीत “कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ”, म्हणजे आपलाच माणूस आपल्या पतनाला कारणीभूत आहे, हे सिध्द झाले आहे, असेही मत दरेकर यांनी व्यक्त केले.