समीर वानखेडेचा देखील केंद्र सरकारने वापर केला हे येत्या काळात स्पष्ट होणार : नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला.

    मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. यावेळी केंद्र सरकार तपास यंत्रणा, आय़एएस, आयपीएस अधिकाऱ्यांचा ज्या पद्धतीने वापर करत आहे. ते अनेक गोष्टींमधून दिसून आलेआहे. परमबीर सिंगला देखील बाहुले बनवून त्यांनी वापर केला. परमबीर सिंग कुठं गेला पत्ता नाही. अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचा वापर करण्याचा काम केंद्रात बसलेलं भाजपाचं सरकार करत आहे. तसच समीर वानखेडेचा देखील वापर केलेला आहे आणि हे उद्याचा काळात स्पष्ट होणार आहे, असे पटोले म्हणाले.

    भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याकडे मोर्चा वळवला आहे, यासंदर्भात विचारण्यात आले असता पटोले म्हणाले की,’काँग्रेसमधील एकाही मंत्र्यावर ते आरोप करू शकत नाही व सिद्ध देखील करू शकत नाही. छगन भुजबळांवर असेच आरोप करून अडीच वर्षे तुरूंगात ठेवलं. उच्च न्यायालायाने ते निर्दोष असल्याचं सांगितलं. त्यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल होऊ शकले नाहीत. या पद्धतीचे खोटे आरोप करून राजकारण करणारी जी भाजपाची पिलावळ आहे, त्याला आता लोक त्यांची जागा दाखवणार. काँग्रेसवर आरोप केले तर आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत, आता कारवाईला आम्ही देखील तयार आहोत.’ असे पटोले म्हणाले.

    दरम्यान, भाजपाला देशभरात झालेल्या पोटनिवडणुकात जे अपयश आलं, त्यावर हिमाचलच्या भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने जी महागाई वाढवली. त्याचे परिणाम हे आहेत की आमच्या सर्व जागा हरल्या. मागील दोन वर्षांपासून आम्ही त्यांच्याशी भांडतोय की डिझेल-पेट्रोल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी असताना, तुम्ही ही दरवाढ केली. ७० टक्क्यांनी त्यांनी दरवाढ केली होती. पाच-दहा रुपयांनी कमी करून फार काही उपकार केलेले नाहीत. किमान ६० रुपये प्रति लिटरमागे कमी केले पाहिजेत. हा दिखावा आहे, यामुळे लोकांना लुटण्याची जी मानसिकता होती, ती स्पष्ट झाली. म्हणून लोकांनी आता असा निर्णय केलेला आहे की महागाई जर कमी करायची असेल तर भाजपाला सत्तेपासून दूर करा. राज्य सरकारची जी भूमिका आहे, ती काही दिवसात राज्य सरकार देखील याबाबत विचार करेल आणि राज्य सरकारचे जे काही थोडेफार कर आहेत, ते कमी केल्या जातील, असेही यावेळी पटोले म्हणाले.