Sanjay Raut

मुख्यमंत्री घरी बसूनच असल्याची त्यांच्यावर सातत्याने टीका होत होती. या टीकेचाही राऊत यांनी समाचार घेतला. घरी बसून टॉप पाचमध्ये येता येते का? ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, स्टॅलिन हे टॉप फाईव्हमध्ये आले ते घरी बसून आले का? याचे उत्तर विरोधकांनी दिले पाहिजे, असे सांगताना त्याकाळात प्रत्येकाला वर्क फ्रॉम होमच करायचे होते.

    मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका करत ही  यात्रा तिसऱ्या लाटेला निमंत्रण असल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी संवाद साधताना खा राऊत म्हणाले की, जनआशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सर्वांना माहित आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचे तुम्ही नियोजन करत आहात, शक्ती प्रदर्शने करत आहात, ते म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच आहे. ते मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असे आवाहनही राऊत यांनी केले आहे.

     

    देशात भाजपचा आलेख कोसळला
    देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश झाला आहे. उद्धव ठाकरे टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. पण भाजपचा एकही लोकप्रिय मुख्यमंत्री या टॉप फाईव्हमध्ये नाही, याचे आश्चर्य वाटते. खरे तर त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. ज्या प्रकारे देशात भाजपचा आलेख कोसळत आहे. त्याचाही हा एक परिणाम आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

    हा जनतेचा पोल आहे
    उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात नेहमी राजकारणाच्या पलिकडे जाऊन काम केले आहे. खासकरून कोरोना काळात. ज्या प्रकारे त्यांनी मुंबईसह संपूर्ण राज्याला कंट्रोल केले. त्यामुळे ते राज्यात नंबर वन आहेत. हळूहळू त्यांचा ग्राफ वाढेल आणि या यादीत ते पहिले ठरतील. आणखी भाजपचे मुख्यमंत्री या यादीत स्थान आणू शकले नाहीत. आता भाजपवाले या पोलवर आक्षेपही घेतील. नावेही ठेवतील. जेव्हा तुमची नावे येत होती तेव्हा पोल योग्य होता. आता आमच्या मुख्यमंत्र्यांचे नाव येत असेल आणि ममता बॅनर्जीचे नाव येताच तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात कराल. हा पोलच आहे आणि जनतेचा पोल आहे, असेही खा राऊत  म्हणाले.

    त्याला आम्ही काय करणार
    मुख्यमंत्री घरी बसूनच असल्याची त्यांच्यावर सातत्याने टीका होत होती. या टीकेचाही राऊत यांनी समाचार घेतला. घरी बसून टॉप पाचमध्ये येता येते का? ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, स्टॅलिन हे टॉप फाईव्हमध्ये आले ते घरी बसून आले का? याचे उत्तर विरोधकांनी दिले पाहिजे, असे सांगताना त्याकाळात प्रत्येकाला वर्क फ्रॉम होमच करायचे होते. तुम्ही उकीरडे फुंकत फिरलात कारण नसताना, त्याला आम्ही काय करणार, अशी बोचरी टिका त्यांनी केली.