rahul gandhi

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना झालेल्या धक्काबुक्कीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी निषेध केला आहे. तसेच इतर नेत्यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुंबई : राहुल गांधीच्या धक्काबुक्कीनंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. महात्मा गांधींचे नाव घ्यायचं आणि कृती उलटी करायची… रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपाची (BJP) पध्दत पुन्हा एकदा पुढे आली आहे असा जोरदार टोला लगावतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना झालेल्या धक्काबुक्कीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी निषेध केला आहे. हाथरसमधील (Hathras) पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करुन खाली पाडले.

देशातील एका प्रमुख पक्षाच्या प्रमुखाला अशाप्रकारे दिलेली वागणूक ही अत्यंत निंदनीय आहे असेही जयंत पाटील म्हणाले. भाजपाने ज्यापध्दतीने उत्तरप्रदेश आणि देशामध्ये बळाचा वापर करून बरीच आंदोलने चिरडली तसेच राहुल गांधी यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रकार आहे. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध करतानाच भाजपाने वेळीच आपली धोरणं व भूमिका सुधारली पाहिजे नाहीतर देशातील परिस्थिती आणखी बिकट होईल अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यासोबत पोलिसांनी केलेल्या दंडेलीने उत्तरप्रदेशात जंगलराज असल्याचे सिद्ध झाले, अशी संतप्त प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.काँग्रेस नेत्यांसोबत आज उत्तर प्रदेशात झालेल्या गैरवर्तुणकीबद्दल ते बोलत होते. हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेले खा. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना ज्या पद्धतीने रोखण्यात आले, धक्काबुक्की झाली, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले ते पाहता उत्तर प्रदेशात लोकशाहीचे, कायद्याचे राज्य नसल्याचे स्पष्ट झाले. उत्तर प्रदेशात जंगल राज आहे, असे नेहमीच म्हटले जाते आणि आज काँग्रेस नेत्यांना रोखून सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, अत्याचार दडपण्याचा प्रयत्न झाला, सर्व कायदे-नियम धाब्यावर बसवण्यात आले, माणुसकीला हरताळ फासला गेला, ते पाहता उत्तर प्रदेशात खरोखरच जंगल राज आहे, हे स्वतः तेथील राज्य सरकारनेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले, असे चव्हाण पुढे म्हणाले.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना यमुना एक्सप्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की झाली हे अतिशय निंदाजनक असून या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर निषेध केला आहे. कुठल्याही राज्याचं प्रशासन असू दे…बलात्कारासारखी लाजिरवाणी घटना घडल्यावर प्रशासनाने फास्टट्रॅक पद्धतीने ॲक्शन घेतली पाहिजे. ती व्हावी या मागणीसाठी संसद सदस्य आणि कॉंग्रेसचे नेते असलेले राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात होते. त्याठिकाणी युपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

काय घडले ?

हाथरसमधील ( Hathras) अत्याचार पीडितेच्या भेटीसाठी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandh) आणि प्रियंका गांधी यांना उ. प्रदेशात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. मात्र पीडितेच्या भेटीवर ठाम असलेले राहुल गांधी आणि प्रियंका हे कार्यकर्त्यांसोबत पायी हाथरसकडे निघाले आहेत. यावेळी त्यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्काबुक्की केली आहे. या धक्काबुक्कीत राहुल गांधी रस्त्याच्या कडेला पडले. या धक्काबुक्कीत पोलिसांनी राहुल गांधी यांची कॉलर पकडण्याचाही प्रयत्न केला.