आरे वनाच्याविरोधी  असणाऱ्यांना उकळ्या फुटण्याचे कारण नाही; जयंत पाटील यांचा भाजप नेत्यांना टोला

मुंबईच्याजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठं वन असणं हे मुंबईकरांसाठी फार भाग्याचं आहे. आणि त्याच वनांमध्ये वेगवेगळे प्रकल्प करायला लागलो तर पर्यावरणाची हानी होते. सरकारने ती भूमिका घेतली आहे आणि पूर्वी ठरलेलं होतं त्यात काही बदल केले त्यावर आकांडतांडव करण्याची गरज नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

मुंबई : कांजूरमार्ग कारशेड जागेला कोर्टाने स्टे दिला असला तरी त्याची अंतिम सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. परंतु आरे वनाच्याविरोधी जे लोक आहेत त्यांना उकळ्या फुटण्याचे कारण नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला आहे.

कोर्टाचे असे निर्णय होत असतात. कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्याचं राजकीयकरण करण्याची आवश्यकता नाही. सरकारने जी पावलं उचलली त्यासंबंधात कुणी कोर्टात गेलं आणि कोर्टात गेल्यावर कोर्टाने वेगळा निर्णय ऐकला तरी अंतिम निर्णय लागलेला नाही.  ती जमीन सरकारची आहे की नाही त्यात वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे कोर्टाला वेळ हवा आहे म्हणून तात्पुरता स्टे दिलेला आहे अंतिम तारीख फेब्रुवारीमध्ये आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

मुंबईच्याजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठं वन असणं हे मुंबईकरांसाठी फार भाग्याचं आहे. आणि त्याच वनांमध्ये वेगवेगळे प्रकल्प करायला लागलो तर पर्यावरणाची हानी होते. सरकारने ती भूमिका घेतली आहे आणि पूर्वी ठरलेलं होतं त्यात काही बदल केले त्यावर आकांडतांडव करण्याची गरज नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

आरेमध्ये आधीच अतिक्रमण झालं आहे. त्याच्यात आणखी वाढ होतेय त्यात आणखी होवू नये म्हणून पर्यावरणमंत्र्यांनी भूमिका घेतली परंतु आता राजकीय हितासाठी काही लोक आकांडतांडव करत आहेत. प्रत्येकाला प्रत्येक निर्णयात राजकारण करायचं असेल तर त्याला काही इलाज नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.