कामगारांचे जीवन बारकाईने टिपण्याचा प्रयत्न जयंत पवार यांनी केला; पत्रकारिता क्षेत्रांतील सहकाऱ्यांच्यावतीने स्मृती अभिवादन सभेचे आयोजन

    मुंबई (Mumbai) : विद्रोही नाटककार, कथाकार, समीक्षक, पत्रकार जयंत पवार यांचे नुकतेच निधन झाले. पवारांना श्रदधांजली वाहण्यासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळ, कला, पत्रकारिता क्षेत्रांतील सहकाऱ्यांच्यावतीने स्मृती अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रभादेवी येथील भूपेश भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेला साहित्य, कला, पत्रकारिता, राजकीय अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पवार यांच्या स्मृतीला अभिवादन करत आपले विचार व्यक्त केले.

    डॅा. भालचंद्र मुणगेकर, कॅा. प्रकाश रेड्डी, कॅा. राजन बावडेकर, संध्या नरे पवार, कॅा. सुबोध मोरे, प्रभाकर नारकर, किशोर ढमाले, मंगेश कदम, अविनाश कदम, अविनाश कोल्हे, डॅा. राजन बावडेकर, समर खडस आदींसह बऱ्याच मान्यवरांनी यावेळी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. डॅा. भालचंद्र मुणगेकरांनी विजय तेंडुलकरांच्या मुखातील शब्द बोलून दाखवत पवारांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव आपल्या संभाषणाद्वारे केला. ते म्हणाले की, ३५ वर्षे नाटकांचे लेखन केल्यानंतर ‘अधांतर’ नाटक पाहिल्यावर माझा अहंकार गळून पडला, हे विजय तेंडुलकर व्यक्त करतात यातच जयंतच्या लेखनाची ताकद दिसून येते. जयंतचे नाट्यसमीक्षण वाचताना आपण प्रत्यक्ष नाटक पहातो आहोत असेच वाटते, असेही मुणगेकर म्हणाले.

    विजय केंकरे म्हणाले की, जयंत समीक्षा लिहीताना संयतपणे लिहायचा. त्याने समीक्षा लिहीताना सुचवलेले मुद्दे नंतर बऱ्याचदा दुरुस्त झाल्याची आठवणही केंकरेंनी करून दिली. मुंबईवरच्या झगमगाटामागे किती भेसूर चेहरा आहे, हे मांडणारा लेखक होता जयंत असं म्हणत राजीव खांडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पवार हे समाज मनाचे भाष्यकार होतेच; परंतु व्यक्तीस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते व ठामपणे भूमिका मांडणारे विचारवंतही होते, अशी भावना प्रभाकर नारकर यांनी व्यक्त केली.

    प्रकाश रेड्डी म्हणाले की, मुंबईतील कामगारांचे जीवन बारकाईने टिपण्याचा प्रयत्न जयंतने आपल्या लेखणीतून कायम प्रयत्न केला. सांस्कृतिक दहशतवादावर लेखन केले व त्या विरोधात भक्कमपणे उभे राहण्याची हिंमतही दाखवल्याचे रेड्डी म्हणाले.

    शहाबाज खान यांच्या म्हणण्यानुसार, मराठी नाट्यसृष्टीत ठामपणे भूमिका घेण्याची प्रथा जयंतने सुरू केली व नाटक, कथालेखनाद्वारे सोशितांविषयी लेखन करताना त्याने तळ गाठला, त्यामुळेच तो उंची गाठू शकल्याचं खान म्हणाले. ‘अधांतर’ हे जयंतचे भावविश्व होते, तो तरुणपणी ज्या वस्तीत रहात होता आणि जे अनुभवले होते, त्याचेच प्रतिबिंब त्याच्या लेखनात उमटल्याची भावना अविनाश कोल्हे यांनी व्यक्त केली. डॅा. राजन बावडेकर या स्मृतीसभेच्या अध्यक्षस्थानी होते.