अमेझॉनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; भारतात आठ हजार लोकांना रोजगार मिळणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं आहे. अशा स्थितीत आता अॅमेझॉन या जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीने 55 हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यापैकी 40 हजार नोकऱ्या या अमेरिकेत देण्यात येणार आहेत. भारतात यापैकी 8000 नोकऱ्या देण्यात येणार आहेत.

  मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं आहे. अशा स्थितीत आता अॅमेझॉन या जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीने 55 हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

  दरम्यान यापैकी 40 हजार नोकऱ्या या अमेरिकेत देण्यात येणार आहेत. भारतात यापैकी 8000 नोकऱ्या देण्यात येणार आहेत. इतर नोकऱ्या या जपान आणि जर्मनीमध्ये आणि इतर देशांत देण्यात येतील.

  भारतामध्ये जवळपास 8000 नोकऱ्या देण्यात येणार

  येत्या 16 सप्टेंबरला अॅमेझॉनच्या वतीनं ‘Amazon Career Day’ चे आयोजन करण्यात आलं आहे. भारतामध्ये जवळपास 8000 नोकऱ्या देण्यात येणार आहेत. बंगळुरु, चेन्नई, गुरुग्राम आणि मुंबई या चार शहरांसहित देशातील 35 शहरांत या नोकऱ्या उपलब्ध असतील. महाराष्ट्रातील पुण्याचाही या मध्ये समावेश आहे.

  ‘Amazon Career Day’ या कार्यक्रमात अॅमेझॉनचे सीईओ अॅन्डी जेसी हे भाग घेणार असून या वेळी कंपनीची पुढील वाटचाल, भविष्यातील योजना आणि इतर अनेक गोष्टींवर चर्चा करण्यात येणार आहे. येत्या 2025 सालापर्यंत भारतात एकूण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे 20 लाख रोजगार देण्याचं अमेझॉनचे ध्येय असल्याचं भारतातील अॅमेझॉनच्या एचआर दिप्ती वर्मा यांनी सांगितलं.

  ‘Amazon Career Day’ हा कार्यक्रम भारतासहित जर्मनी, जपान, इटली , कॅनडा, ब्रिटन या देशातही एकाच वेळी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये करियर डे चे आयोजन हे केवळ अमेरिकेत होत होतं. याला मिळणारा प्रतिसाद पाहता यावेळी अमेरिकेच्या बाहेरही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

  तसेचं भारतात आयोजित ‘Amazon Career Day’ मध्ये कंपनीचे 140 अधिकारी हे नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांशी संवाद साधणार आहेत. भारतात पहिल्यांदाच अॅमेझॉनच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून इतक्या मोठ्या प्रमाणावर भरतीही पहिल्यांदाच करण्यात येत आहे.