पीडिता बेपत्ता म्हणून आरोपीला जामीन मंजूर , अल्पवयीन पीडिता एप्रिल २०२१ पासून बेपत्ता; पोलीस शोधात

आरोपीला एप्रिल २०१८ मध्ये अंधेरी पोलिसांनी अटक केली. तिने नोंदवलेल्या जबाबानुसार, आरोपीने त्याच्या भावासह दारू आणि खाण्याचे आमिष दाखवून तिच्यावर पाशवी कृत्य केले. तर सदर पीडिता ही देहविक्री व्यवसायात सक्रिय असून तिचा आधी गर्भपात झाला असल्याचा प्रत्यारोप आरोपीकडून करण्यात आला होता.

    मुंबई : लैंगिक अत्याचाराचा आरोप करणारी अल्पवयीन मुलगीच एप्रिल २०२१ पासून बेपत्ता आहे. तसेच सदर प्रकरणातील पीडिताही अल्पवयीन असल्याचे सबळ पुरावे सादर करता आलेले नाहीत, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने मूळ आरोपीला जामीन मंजूर केला.

    मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर परिचयाच्या असलेल्या एका इसमाने चालत्या रिक्षामध्ये अमानुष अत्याचार केले. घटना घडत असताना रिक्षा ट्रॅफिक सिग्नलवर थांबल्याने शेजारी वाहनातील चालकाचे मुलीच्या ओरडण्याकडे लक्ष गेल्याने हा प्रकार उघडकीला आला.

    तेव्हा, आरोपीला एप्रिल २०१८ मध्ये अंधेरी पोलिसांनी अटक केली. तिने नोंदवलेल्या जबाबानुसार, आरोपीने त्याच्या भावासह दारू आणि खाण्याचे आमिष दाखवून तिच्यावर पाशवी कृत्य केले. तर सदर पीडिता ही देहविक्री व्यवसायात सक्रिय असून तिचा आधी गर्भपात झाला असल्याचा प्रत्यारोप आरोपीकडून करण्यात आला होता.

    या प्रकरणात आरोपीकडून एप्रिल २०२१ मध्य़े मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल कऱण्यात आला होता. तेव्हा, खटल्यातील पीडिता ही बेपत्ता असल्याचे प्रथम निदर्शनास आले. त्यावेळी मुंबई पोलिसांवर ठपका ठेवत पिडितेचा शोध घेण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते. तेव्हपासून जेव्हा-जेव्हा सदर प्रकऱण सुनावणीसाठी न्यायालयासमोर आले. तेव्हा, पीडिता बेपत्ता असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. त्यानंतर सदर अर्जावर नुकतीच न्या. भारती डांगरे यांच्यासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हाही अंधेरी पोलिसांच्या तपास पथकाने नेहमीप्रमाणे पीडिता अद्यापही बेपत्ता असल्याचे न्यायालयाला सांगितले. मागील काही महिन्यांपासून पोलीस पिडितेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

    मात्र, अद्याप तिचा कोणताही ठावठिकाणा कळू शकलेला नाही. अशा या दुदैवी परिस्थितीमध्ये तिचा शोध घेण्याचे निर्देश देण्यापलीकडे न्यायालय काहीच करू शकत नाही. दुसरीकडे, आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल असले तरीही पीडितेवर अत्याचाराचा गुन्हा घडला त्यावेळी ती अल्पवयीन असल्याचे पुरावे, कागदपत्र उपलब्ध नाहीत. ठोस पुराव्यांच्या अनुपलब्धतेमुळे आरोपीला जास्त काळ कारागृहात ठेवणे योग्य ठरणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने नाईलाजाने आऱोपीचा अर्ज स्वीकारत त्याला जामीन मंजूर केला.