‘कराची स्वीट्स’ चा पाकिस्तानशी काहीही सबंध नाही; मनसेच्या मागणीला संजय राऊतांचा जाहीर विरोध 

कराची बेकरी आणि कराची स्वीटसचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही, कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोध दर्शवला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून मनसेच्या मागणीला जाहीरपणे विरोध केला आहे.

मुंबई : कराची बेकरी आणि कराची स्वीटस या नावावरुन मुंबईत सध्या शिवसेना मनसेमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. ‘कराची स्वीट्स’ने आपल्या दुकानाचे नाव बदलावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले आहे. तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेच्या या मागणीला विरोध केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी कराची स्वीट्स दुकानाच्या व्यवस्थापनाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. कराची हे पाकिस्तानातील एक शहर आहे. या नावावर असलेल्या कराची स्वीट्स या नावावर मनसेने आक्षेप घेतला आहे. याबाबत मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी दुकान व्यवस्थापनाला एक पत्र पाठवले आहे. तसेच संबंधित आस्थापनाला न्यायालयात खेचण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

देशाचा पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानातील कराची या नावाचा आधार घेत आपण बहुचर्चित आस्थापन सुरू केले आहे. त्याचा प्रचार व विस्तार करून भारतीयांचा भावनांना ठेच पोहोचवून व्यवसाय करत आहात. तसेच मराठी भाषेचाही द्वेश करत आहात त्याबाबत आक्षेप आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

मुंबईत आणि महाराष्ट्रात यापुढे कराची नाव चालणार नाही. पाकिस्तानातील कराची म्हणचे नामचीन आतंकवाद्यांचा अड्डा मग त्यांचा महाराष्ट्रात उदो उदो कशाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मुंबईत राहता मग मुंबईचा अभिमान बाळगा. पाकिस्तान आणि कराचीच्या आठवणी मुंबईत चालणार नाहीत.

कराची बेकरी, कराची स्वीट, कराची स्कूल मुंबईत चालणार नाहीत. १५ दिवसांत कराची नावे असलेल्या पाट्या बदला, असा इशारा नांदगावकर यांनी दिला आहे.

कराची बेकरी आणि कराची स्वीटसचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही, कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे, असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोध दर्शवला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून मनसेच्या मागणीला जाहीरपणे विरोध केला आहे. तसेच कराची स्वीट्सच्या नावावरून मनसेची कानउघडणी सुद्धा केली आहे. कराची बेकरी आणि कराची स्वीटस 60 वर्षापासून मुंबई सह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून ऊभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे, असे राऊत म्हणाले. मात्र, ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.