व्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसुत्रीने ह्रदयरोगला ठेवा दूर

कोरोना काळात ह्रदयाच्या रुग्णांना धोका अधिक

मुंबई : ह्रदयाशी संबंधित आजार असल्यास कोरोनाच्या विषाणूच्या संक्रमणाचा धोका दुपटीने वाढतो. सध्याच्या काळात अनेकजण घरात बसूनच काम करीत असल्याने अनेकांचा दिनक्रम बदलला आहे. खाण्यापिण्याच्या सवयी आणि औषध घेण्याच्या वेळा बदलल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकांने खास करून ह्रदयाचे विकार असलेल्यांनी घरातच चालण्याचा व्यायाम, योगासने आणि योग्य आहार विहाराच्या सवयी लावल्या तर ह्रदयरोगाला लांब ठेवता येईल असा सल्ला प्रख्यात कार्डिआँलाँजीस्ट डाँ. पवन कुमार यांनी दिला आहे.

ह्रदयविकाराबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक ह्रदय दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जगात सुमारे १ कोटी ७५ लाख लोकांना ह्रदयविकाराने मृत्यु होतो.देशात होणा-या मृत्युपैकी सुमारे ३३ टक्के मृत्यु ह्रदयरोगाने होतात. मागील काही काळात तरुण पिढीमध्ये ह्रदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी, जंक फूड, बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे तरुण पिढीत ह्रदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. सध्याच्या कोरोनाच्य काळात तर अनेक जण वर्क फ्राँम होत करीत आहेत. व्यायामाच्या अभावामुळे अधीच ह्रदय विकाराचा धोका वाढत आहे त्यातच लाँकडाऊन आणि वर्क फ्राँम होममुळे ह्रदयविकार, मधुमेह, लठ्ठपणाचे धोके वाढत आहेत.

या पार्श्वभूमीवर लिलावती रुग्णालयातील प्रख्यात कार्डीआँलाँजीस्ट डाँ. पवन कुमार यांनी ह्रदयविकाराला दूर ठेवण्यासाठी व्यायाम व सकस आहाराचा सल्ला दिला आहे. कारण कोरोनाच्या काळात ह्रदय विकारात गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे ह्रदयातील झडपामध्ये संसर्गचा धोका असतो.

कोरोनामुळे मृत्यु दर दोन टक्के असल्याचे सांगण्यात येत पण मधुमेह, लठ्ठपणा, ह्रदयाचे विकार, किडनी, लिव्हरचे विकार आणि रोगप्रतिकारशक्तीचा अभाव यामुळे मृत्युदर ४ ते ८ टक्क्यांवर जातो असे ते सांगतात.

कोरोना लस व रेमडेसेवीर इंजेक्शन

सध्या कोरोनाच्या उपचारांमध्ये रेमडेसेवीर इंजेक्शनचा उपयोग होतो. पण ही इंजेक्शन उपचारात तेवढी प्रभावी नाही पण स्टिराँईडसमुळे काही प्रमाणात रुग्णाला फायदा होत असल्याचे दिसून येते असे डाँ. पवन कुमार सांगतात. कोरोनाच्या लसीवर आपल्या देशासह संपूर्ण जगात संशोधन सुरु आहे. पण कोरोनाच्या विषाणूच्या स्वरुपात(म्युटेशन) बदल आहेत. उदाहरणार्थ गुजरातमधील विषाणू केरळमधील विषाणूपेक्षा वेगळा असू शकतो. त्याचा लसीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कोरोनावर मात केलेल्या लोकांमध्ये चार ते आठ आठवड्यानंतर अँटीबाँडीज कमी होताना दिसतात. त्यामुळे कोरोना पुन्हा होण्याची भीती असते पण एन्फ्ल्यूएन्झामध्ये अँडीबाँडीज एक वर्षापर्यंत शरिरात असतात याकडे डाँ. पवनकुमार यांनी लक्ष वेधले.

-दररोज किमान तीस मिनिटे व्यायाम ह्रदयासाठी फायदेशीर

-जेवणात मीठाचे प्रमाण कमी करा

-न्याहारी व जेवण वेळेत करा

-धुम्रपानापासून लांब रहा

-कित्येक तास एकाच स्थितीत बसणे ह्रदयासाठी अपायकारक

-तणावावर मात करण्यास शिका