के.ई.एम. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासनाच्या विरोधातील आंदोलनाने रुग्णसेवा कोलमडली, मागण्या मान्य झाल्यावर आंदोलन मागे

मुंबई: परळ येथील केईएम रुग्णालयात सर्व संवर्गातील कोरोना निगडित उद्भवलेले प्रश्न आणि प्रशासन कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्यासाठी करत असलेला कानाडोळा यामुळे अनेक कर्मचाऱ्यामध्ये नाराजीचा सुर उमटत

 मुंबई: परळ येथील केईएम रुग्णालयात सर्व संवर्गातील कोरोना निगडित उद्भवलेले प्रश्न आणि प्रशासन कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्यासाठी करत असलेला कानाडोळा यामुळे अनेक कर्मचाऱ्यामध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. ज्यामुळे आज रुग्णालयातील सर्व संवर्ग कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सकाळी तब्बल पाच तास जोरदार आंदोलन केले. ज्यामुळे बराच वेळ रुग्ण सेवा कोलमडली होती.

अखेर प्रशासनाने  मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर दुपारनतर आंदोलन मागे घेण्यात आले, असे म्युनिसिपल मजदूर यूनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले. शिवाय संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि यूनियनबाजी न केल्याने आपल्या मागण्या मान्य जाल्या असल्याचेही प्रदीप नारकर म्हणाले. दरम्यान, यावेळी कर्मचाऱ्याच्या मुद्द्यावर ज़ालेल्या चर्चेत के.ई.एम.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख  डॉ निर्मला बारसे, सह प्रमुख कर्मचारी अधिकारी  मिलिंद शहाणे, प्रशासकीय अधिकारी पांगम आणि सर्व संवर्गातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
कर्मचाऱ्याच्या मागण्या आणि प्रशासनाने दिलेले आश्वासन 
१) रोजंदारी सफाई कामगार सुरेंद्र सतबिरसिंग सरकनिया, यांचे निधन झाले २४ मे, २०२० रोजी संध्याकाळी ६.५० वाजता मृत्यू घोषित करण्यात आला परंतु  २६ मे २०२० सकाळ पर्यंत डीसी दिलेले नाही.
 
– सुरेंद्र सतबिरसिंग सरकनिया कोरोना हाय रिस्क वॉर्ड नंबर २० येथे कार्यरत होते. मागील ४ दिवसांंपासून ताप, अंगदुखी, भूक लागत नाही, तोंडाची चव आदी लक्षणे तसेच डॉक्टर्स यांचे जुने पेपर पहाता, त्यांना कोरोना संशयित म्हणून डीसी देण्यात येईल. तसेच त्यांच्या कुटुंबियांना महापालिकेकडून
विशेष अनुदान रु. ५० लाख आणि पी. टी. केसद्वारे नोकरी देण्याबाबत शिफारस देण्यात येईल, असे मान्य करण्यात आलेले आहे.
 
२) कोरोना रुग्णांची सेवा देत असताना कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोना प्रादुर्भाव झाल्यास त्यांना स्वतंत्र कक्षामध्ये दाखल करण्यात यावे.
 
– कर्मचाऱ्यांना कोरोना प्रादुर्भाव झाल्यास त्यांना स्वतंत्र  कक्ष क्र. २,१० तसेच महात्मा गांधी रुग्णालय येथे ५० बेड, डोम, जी. टी.बी. – बी/ब्लॉक संपूर्ण २ मजली इमारत यामध्ये दाखल करून डॉक्टर्स यांच्या सल्ल्यानुसार उपचार देण्यात येईल.
 
३) कोरोनामध्ये काम करणाऱ्या सर्व संवर्गातील कर्मचारी आणि मुंबई बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांना राहाण्याची सोय करणे
 
–  टाटा हॉस्पिटल समोरील ओ.सी. (बिल्डिंग) येथील पहिल्या मजल्यावर चतुर्थश्रेणी कामगार, तसेच दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर नर्स, डॉक्टर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांना रहाण्याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच चहा, नाष्टा जेवण अशी सर्व व्यवस्था तातडीने करण्याचे मान्य करण्यात आले.
 
४) रोजंदारी आणि बहुउद्देशीय   कामगार हे कोरोनामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांना रिक्त पदांवर सामावून घेण्याबाबत महापालिका आयुक्तांना शिफारस करण्यात यावी.
– जे रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगार हे कोव्हिड-19 मध्ये सध्या काम करीत आहेत, त्यांची शिफारस करण्यात येईल.
 
५) कामगारांची बदनामी करणाऱ्या विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा जाहीर निषेध करण्यात यावा.
–  कामगार चांगले काम करीत आहेत, माझी कोणतीही तक्रार नाही, ज्या कर्मचाऱ्यांना ताप अंगदुखी किंवा अन्य त्रास असेल त्यांनी डॉक्टर्स यांच्याकडे जावे, तसेच ५५ वर्षावरील आणि अपंग कर्मचारी यांनी कामावर येऊ नये, कंटेंमेंट झोन मधील कर्मचारी यांनीही कामावर येऊ नका कोणावरही कारवाई केली जाणार नाही असे आश्वासन देण्यात आले.
 
६) रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगार यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या १० तारिखला देण्यात यावा.
– रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगार यांचा पगार १० तारखेपर्यंत देण्याच्या सूचना देत आहे, ज्या अडचणी आहेत त्या दूर केल्या जातील.
 
७) रु. ३००/- दैनंदिन भत्ता दिला जात नाही.
– रु. 300/- दैनंदिन भत्ता यापुढे पगारातून देण्यात येईल, फक्त रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगार यांना रोखीने भत्ता देण्यात येईल.
 
८) रिलायन्स कंपनीकडून देण्यात येणाऱ्या रु.१५००/- चे कुपन्स सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना  देण्यात यावेत.
– रिलायन्स कंपनीकडून देण्यात येणाऱ्या रु.१५००/- चे किराणा कुपन्स सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना  देण्यात येतील. सध्या ७०० कुपन्स उपलब्ध आहेत. प्राधान्याने कोरोना कक्ष, ओ.पी. डी. येथे कार्यरत असलेल्या कामगारांना ते देण्यात येईल. प्रामुख्याने रोजंदारी, बहुउद्देशीय कामगार आणि चतुर्थश्रेणी कामगारांना प्रथम कुपन्स देण्यात येतील त्यांनतर नर्स व अन्य कर्मचाऱ्यांना रिलायन्स कुपन्स देण्यात येतील.