केजी ते दुसरीचे ऑनलाईन वर्ग सुरूच

-शिक्षण विभागाच्या आदेशाकडे शाळांचे दुर्लक्ष मुंबई :ज्युनियर केजी ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. असे असतानाही अनेक

-शिक्षण विभागाच्या आदेशाकडे शाळांचे दुर्लक्ष

मुंबई : ज्युनियर केजी ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. असे असतानाही अनेक शाळा त्याकडे दुर्लक्ष करत पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सर्रास घेत असल्याचे समोर आले आहे.

त्याचबरोबरच ऑनलाईन वर्ग सुरू झाल्याने शाळांकडून शुल्क मागण्याचा तगादा पालकांच्या मागे लावला असल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण पद्धतीला प्राधान्य दिले आहे. त्याचवेळी पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागांनी शाळांना दिले आहेत. असे असतानाही अनेक शाळा पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेत आहेत. त्याचप्रमाणे अन्य वर्गांचे ऑनलाईन अध्ययन हे कमाल तीन तास असून, त्यातही विद्यार्थ्यांना ब्रेक देण्याच्या सूचना आहेत. परंतु सर्व इयत्तांचे वर्ग हे चार ते पाच तासांचे असतात.

याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन वर्गाचे नियम धाब्यावर बसवण्याबरोबरच काही शाळांकडून ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आल्याने तातडीने शुल्क भरण्यात यावे असा तगादा पालकांच्या मागे लावला आहे.लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शुल्क भरण्यासाठी पालकांना सवलत देण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या असताना देखील अनेक शाळांनी त्याकडे दुर्लक्ष करत मनमानी पद्धतीने ऑनलाईन वर्ग घेत शुल्क वसुली करण्यास सुरुवात केली असल्याच्या तक्रारी पालकांकडून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे करण्यात येत आहेत.

कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच पालकांचे रोजगार धोक्यात आले आहेत. काहींची पगार कपात, काहींची नोकरी गेल्याने पालकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लॉकडाऊनदरम्यान पालकांना शुल्क भरण्यात सवलत देण्यात यावी असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. ऑनलाईन वर्ग सुरू केल्याने शुल्क भरण्याचा तगादा शाळांकडून पालकांच्या मागे लावण्यात आला आहे.

त्यामुळे शासन आदेशाचे पालन न करणार्‍या शाळांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच शैक्षणिक संस्था व्यवस्थापनावर साथ नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.