apex hospital

मुलुंडमधील अपेक्स हॉस्पिटल आग दुर्घटनेत ज्या व्यक्तीला मृत घोषित केले, ती प्रत्यक्षात जिवंत असून ठणठणीत असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केल्यामुळे खळबळ उडाली. काही वेळात चित्रही स्पष्ट झाले.

मुंबईतील मुलुंडच्या अपेक्स हॉस्पिटलला (Apex Hospital) लागलेल्या आगीत (Fire) मरण पावलेल्या रुग्णाच्या नावावरून सध्या चांगलाच गोंधळ उडाला आहे. पांडुरंग डी. कुलकर्णी (Pandurang Kulkarni)  या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिकेनं (BMC) दिली. मात्र कुलकर्णी हे ठणठणीत असून आपण त्यांची भेट घेऊन विचारपूसही केली, असा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विट करून केला.

      त्यानंतर अपेक्स हॉस्पिटलला भेट दिली असता खरा प्रकार लक्षात आल्याचंही सोमय्यांनी पाठोपाठ केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय. वास्तविक पांडुरंग दत्तात्रय कुलकर्णी, वय 84, राहणार वर्तक नगर, ठाणे यांचा मृत्यू झाला. पण पांडुरंग द्वारकानाथ कुलकर्णी, वय 84, राहणार मुलुंड यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे आपण मुलुंडमधील कुलकर्णींना भेटलो, असंही सोमय्या यांनी म्हटलंय.

      मुलुंडमधील अपेक्स हॉस्पिटलला सोमवारी संध्याकाळी आग लागली होती. त्यानंतर तिथे दाखल असणाऱ्या 40 रुग्णांना इतर इस्पितळांत हलवण्यात आले. व्हेंटिलेटर असणाऱ्या तीन व्यक्तींपैकी एकाचा या दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली होती. मात्र नाव, आडनाव आणि वय यांत साधर्म्य असल्यामुळे हा गोंधळ उडाल्याचे लक्षात आले.