ऐरोली आणि मरोळ मच्छी बाजार स्थलांतरास कोळी बांधवांचा विरोध

कोळी बांधवांना हा तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का असे विचारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले एक वेळ आमच्या पाठीवर मारा मात्र पोटावर मारू नका. आमची सरकारला विनंती आहे की आमचं इथून स्थलांतर करू नका

    मुंबई: मुंबईमध्ये कोळी बांधवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दादर आणि परळ या दोन स्थानकांदरम्यान स्वर्गीय मीनाताई ठाकरे मासळी बाजार आहे. सध्या हा बाजार येथून स्थलांतरित करण्याचा घाट घातला जातोय,असा आरोप स्थानिकांनी केला आहे. याचे स्थलांतर नवी मुंबईतील ऐरोली आणि मरोळ मच्छी बाजार याठिकाणी केले जाणार आहे. मात्र या स्थलांतराला कोळी बांधवांनी तीव्र विरोध केला आहे.

    अनेक वर्षांपासून आम्ही दादर परिसरात मासे विकत आहोत. मासे विक्री हेच आमचे उदरनिर्वाहाचं एक मात्र साधन आहे. आणि आमचं हे साधन प्रशासन हिरवून घेत आहे. याच मुद्द्यावरून आज विरोधी पक्षांकडून दादरमध्ये आंदोलन देखील करण्यात आलं. कोळी बांधवांना हा तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का असे विचारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले एक वेळ आमच्या पाठीवर मारा मात्र पोटावर मारू नका. आमची सरकारला विनंती आहे की आमचं इथून स्थलांतर करू नका. जर आमची मागणी तुम्ही ऐकणार नसाल तर आमच्या अस्तित्वावर उठलेल्या यांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ अशी भूमिका कोळी भगिनींनी व्यक्त केली.