कोमल करपे, आणि ऋतुराज देशमुख या तरुण सरपंचांनी असे केले गाव कोरोनामुक्त; पाहा व्हिडिओ

कोमल करपे, आणि ऋतुराज देशमुख या दोघा तरूण सरपंचाकडून आदर्श घेवून राज्य सरकारने संपूर्ण राज्यात कोरोनामुक्त गाव ही योजना लागू केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंतरोळी व मोहोळ तालुक्यातील घाटणे या दोन गावातील कारभार ग्रामस्थांनी दोन तरुणांच्या हातात दिला. विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर केवळ एकविसाव्या वर्षीच सरपंच झालेल्या या दोघांनी करोनासारख्या संसर्गाला हरवून गावाला दिलासा दिला.

  मुंबई : कोमल करपे, आणि ऋतुराज देशमुख या दोघा तरूण सरपंचाकडून आदर्श घेवून राज्य सरकारने संपूर्ण राज्यात कोरोनामुक्त गाव ही योजना लागू केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंतरोळी व मोहोळ तालुक्यातील घाटणे या दोन गावातील कारभार ग्रामस्थांनी दोन तरुणांच्या हातात दिला. विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर केवळ एकविसाव्या वर्षीच सरपंच झालेल्या या दोघांनी करोनासारख्या संसर्गाला हरवून गावाला दिलासा दिला.

  सोलापूर जिल्ह्यात करोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील दोन एकवीस वर्षांच्या तरुण सरपंचानी आपले कौशल्य पणाला लावून गाव करोनामुक्त करून राज्यासमोर आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. या दोघांचेही कौतुक थेट मुख्यमंत्र्यांनी केले.

  अशी केली कोरोनामुक्ती

  अंतरोळी हे तीन हजार लोकवस्तीचे गाव. फेब्रुवारी महिन्यात कोमल करपे सरपंच झाल्या आणि दोन महिन्यातच करोनाचा संसर्ग सुरू झाला. बघता बघता गावात ऐंशी जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पंधरा जणांचा करोनाने बळी घेतला. करपे यांनी करोनाला रोखण्यासाठी गावात तातडीने मोहीमच सुरू केली. सरकारचे सर्व निर्बंध पाळतानाच गावानेदेखील काही नियम केले. नियम न पाळणाऱ्यांवर दंडाची कारवाई केली.

  पहिल्या टप्प्यात लसीकरणाबाबत गावात जनजागृती करण्यात आली. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी प्रथम आपल्या घरातीलच व्यक्तींना लस दिली. त्यामुळे गैरसमज दूर झाल्याने ग्रामस्थांनी लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला. बाहेरगावी स्थायिक झालेल्या; पण मुळच्या अंतरोळीच्या असणाऱ्या लोकांकडून करोनाला रोखण्यासाठी साहित्य मागविले. यामुळे मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनरच काय, तर गरजूंना धान्यही जमा झाले. ग्रामसुरक्षा दल स्थापून गावात लॉकडाउन कडक केले. सर्वांची तपासणी करून पॉझिटिव्ह रूग्ण शोधून वेळीच उपचार केल्याने संसर्ग थांबला आणि गाव पूर्णपणे करोनामुक्त झाले.

  कोरोनाला रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम

  घाटणे गावाची कहाणी अशीच आहे. करोनामुळे गावातील बाप-लेकाचा मृत्यू झाल्यानंतर घाबरलेल्या ग्रामस्थांनी गाव सोडण्यास सुरुवात केली. अनेकांनी वाडी, वस्तीचा रस्ता धरला. अशा वेळी सरपंच ऋतुराज देशमुख या नवख्या युवा सरपंचाने कोरोनाला रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. गावातील प्रत्येकाची तपासणी करून पॉझिटिव्ह रुग्ण शोधले. त्यांच्यावर उपचार सुरू केले. प्रत्येक घरात मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर देतानाच कडक लॉकडाउन पाळण्याबाबत जनजागृती केली. अनेक उपक्रम राबविल्याचा फायदा झाला आणि हे गावही करोनामुक्त झाले. या तरुण सरपंचांनी आपापली गावे करोनामुक्त करून राज्यासमोर आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यांचे कौतुक करून राज्यातील प्रत्येक सरपंचांनी हा आदर्श घेऊन गाव करोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

  “पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध, तपासणी, लसीकरण, उपचार आणि नियमांचे पालन या पंचसूत्रीमुळेच घाटणे करोनामुक्त झाले. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतल्याचा आनंद अधिक आहे असे घाटण्याचे सरपंच ऋतुराज देशमुख म्हणाले.

  ग्रामस्थांनी आमच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिल्यानेच गाव करोनामुक्त होऊ शकले. योग्य उपचार, जनजागृती, कडक लॉकडाउनला ग्रामस्थांनी दिलेली साथ याचाही करोनामुक्तीत सहभाग असल्याची प्रतिक्रिया अंतरोळीचे सरपंच कोमल करपे म्हणाले.