vaccine corona virus

मुंबई: कोरोनावरील लसीच्या(corona vaccine) मानवी चाचणीचा दुसरा- तिसरा टप्पा मुंबईतील(mumbai) पालिकेच्या केईम आणि नायर रुग्णालयात होणार आहे. अनेक अडचणींवर मात करत अखेर ही चाचणी पालिका रुग्णालयांमध्ये केली जाणार आहे.

अॅस्ट्राझेनेका आणि सिरम इन्स्टिट्यूट उत्पादन करत असलेल्या या लशीच्या अंतिम टप्प्यातील मानवी चाचण्या जगभरात सुरू आहेत. इंग्लंडमधील स्वयंसेवकांवर विपरीत परिणाम जाणवू लागल्याने तेथील चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या. मात्र, आता मुंबईत ही लवकरच क्लिनिकल ट्रायल केली जाणार आहे. शिवाय, डीसीजीआयने ही सर्व प्रकारचे क्लिअरन्स दिले असल्याचे सांगण्यात आले आहे.

देशभरातील १० सेंटरपैकी मुंबईतील केईएम हॉस्पिटल आणि नायर रुग्णालयाची चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. ‘कोविशिल्ड वॅक्सिन’ असे या लसीचे नाव असुन देशभरातील १० सेंटरमध्ये एकूण १६०० निरोगी लोकांवर लसीची एकाच वेळी चाचणी घेतली जाणार आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयामधील १६० (निरोगी लोक) स्वयंसेवकांवर लसीची चाचणी होणार आहे.

आयसीएमआरच्या सूचनांनुसार, सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या लसीच्या चाचणीसाठी देशभरातील १० सेंटर्समध्ये ही चाचणी घेतली जात आहे. या चाचणीचा पहिला टप्पा यूके मध्ये पार पडला असुन दुसरी चाचणी यूकेमधील १० हजार लोकांवर सुरु आहे. तसेच, युएसए आणि ब्राझिल मध्ये देखिल या लसीची चाचणी घेण्यात येईल. महाराष्ट्रातील पुण्यात ही क्लिनिकल ट्रायल सुरू झाली होती ती काही काळ थांबवण्यात आली होती.

भारतातील लसीची चाचणी करण्यासाठी निवडण्यात आलेले सेंटर्स- केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय,बीजे मेडिकल पुणे, एम्स नवी दिल्ली, पाटणा मेडिकल कॉलेज, सरकारी रुग्णालय नागपुर, पीजीआय चंदीगढ ,क्षयरोग रिसर्च सेंटर चेन्नई, जेएसएस मेडिकल कॉलेज मैसुर

आयसीएमआरची आपल्याला क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगी दिली आहे. मात्र, अजून तरी ही ट्रायल रुग्णालयांमध्ये सुरू झालेली नाही. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने अजून मुंबईत वॅक्सिन दिलेली नाही. ती दिली की क्लिनिकल ट्रायल सुरू होईल. – डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता,नायर रुग्णालय