… तर मला राष्ट्रपती राजवट चालेल

“ज्या दिवशी संजय राऊत राष्ट्रपती असतील, त्या दिवशी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली, तरी मला चालेल” हे ट्विट आहे कॉमेडियन कुणाल कामराचं. महाराष्ट्रात या ट्विटवरून खुमासदार चर्चा रंगतेय.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या चर्चांना ऊत आलाय. अभिनेत्री कंगना राणावतपासून अनेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. अगदी सर्वोच्च न्यायालयातदेखील ही मागणी कऱणारी याचिका करण्यात आली होती, जी फेटाळण्यात आली. राजकीय घटनांवर आपल्या खुमासदार विनोदी शैलीत भाष्य कऱण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या स्टंड अप कॉमेडियन कुणाल कामरानंही आता त्याच्या स्टाईलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलीय. मात्र त्यासाठी त्यानं एक अटदेखील घातलीय.

ही अट अतिशय भन्नाट आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे जर राष्ट्रपती होणार असतील, तरच आपल्याला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केलेली आवडेल, असं ट्विट कुणाल कामरानं केलंय.

कुणालनं नुकतीच संजय राऊतांची मुलाखत घेतलीय. त्याच्या ‘शट अप कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या भागाची सुरुवात संजय राऊत यांच्या मुलाखतीनं होणार आहे. संजय राऊतांनी मुलाखत दिली, तरच आपण या पॉडकास्टच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करू, अशी जाहीर भूमिका कुणालनं ट्विटरवर घेतली होती. संजय राऊत यांनी त्याला प्रतिसाद देत मुलाखत देण्याची तयारी दाखवली होती.