मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा शुभारंभ; तीन महिन्यात २० हजार प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार

काळाची गरज ओळखून आपण  हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करत आहोत. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्याद्वारे आरोग्य विभागाला सर्वाधिक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कोरोना संकटकाळात आपण आरोग्य क्षेत्रासाठी सोयी-सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे. पण या सोयी-सुविधा चालवणारे प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. आता कौशल्य विभागाने आज सुरु केलेल्या उपक्रमातून हे मनुष्यबळ तयार होण्याबरोबरच राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. राज्यात ही योजना प्रभावीपणे राबविली जाईल, असे ते म्हणाले.

    मुंबई : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्व अधोरेखीत झाले आहे. या क्षेत्राला भरीव मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. आज सुरु करण्यात आलेल्या योजनेतून आरोग्य क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. हे आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचे महत्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे

    . मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी

    मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, काळाची गरज ओळखून आपण  हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करत आहोत. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्याद्वारे आरोग्य विभागाला सर्वाधिक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कोरोना संकटकाळात आपण आरोग्य क्षेत्रासाठी सोयी-सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे. पण या सोयी-सुविधा चालवणारे प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. आता कौशल्य विभागाने आज सुरु केलेल्या उपक्रमातून हे मनुष्यबळ तयार होण्याबरोबरच राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. राज्यात ही योजना प्रभावीपणे राबविली जाईल, असे ते म्हणाले.

    ३५ ते ४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, योजनेसाठी साधारण ३५ ते ४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. सध्या २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेचे महत्व लक्षात घेता उर्वरीत निधीही उपलब्ध करुन दिला जाईल. सध्याच्या युगात ज्या युवकामध्ये कौशल्य आहे तो कधीही उपाशी राहत नाही. त्यामुळे कौशल्य विकास विभागाच्या या कार्यक्रमाची बेरोजगारी निर्मुलनातही महत्वाची भूमिका ठरेल, असे ते म्हणाले.

    कौशल्य विकास मंत्री मलिक म्हणाले की, आपण ही योजना जाहीर केल्यानंतर केंद्रानेही अशी योजना सुरु केली. सध्या राज्यात या योजनेतून २० हजार युवकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. विभागाने रोजगार निर्मितीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमातून जून २०२१ मध्ये १५ हजार ३६६ बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

    उद्योग मंत्री देसाई म्हणाले की, आरोग्य क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची उणीव भरुन काढण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम महत्वपूर्ण ठरेल. या कार्यक्रमासाठी उद्योग विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.

    सार्वजनिक आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, २०२० मध्ये कोरोनामुळे बेरोजगारीचा निर्देशांक वाढला होता. पण अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे युवकांना रोजगारसंधी उपलब्ध होतील. राज्यातील सर्व जिल्हा, उपजिल्हा, आयुर्वेदीक रुग्णालये यांच्यामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. उमेदवारांना प्रशिक्षणाबरोबरच विद्यावेतनही मिळणार आहे. लसीकरणासारख्या विविध मोहीमांना वेळोवेळी चांगले मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम महत्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी सांगितले.

    वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात कुठेही झाला नाही असा प्रशिक्षण उपक्रम आज आपण सुरु करीत आहोत. तो राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये उत्कृष्टरित्या राबवतील.

    मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.