कोरोनाचे संकट दूर करून जीवन पूर्वीसारखे सुरळीत होवू दे : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांची गणरायाच्या चरणी प्रार्थना!

या वेळी मंदिरांच्या मुद्द्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, मंदिरे सुरु करण्याची आमची मागणी केवळ यासाठी आहे की, आम्ही हिंदू आहोत, आमचे तेहतीस कोटी देव आहेत. सगळीकडे, जिथे आम्ही मानू तिथे देव आहे. पण त्यासोबत या मंदिरांवर अवलंबून असलेले लाखो लोक आहेत मंदिराबाहेर कुणी फुले, कुणी प्रसाद, कुणी उदबत्ती, कुणी हळद-कुंकु विकते.

    मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी फडणवीस यांच्या पत्ती अमृता फडणवीस, मुलगी दिवीजा आणि कुटुंबिय उपस्थित होते.

    जीवन पूर्वीसारखे सुरळीत व्हावे यासाठी प्रार्थना

    यावेळी या विघ्नहर्त्याच्या स्थापनेच्या निमित्ताने आपण त्यांना साकडे घालू की, जगासमोर, देशासमोर, महाराष्ट्रासमोर जे कोरोनाचे संकट आहे, ते संकट आता दूर झाले पाहिजे. आपले जीवन पूर्वीसारखे सुरळीत झाले पाहिजे, अशी प्रार्थना केल्याचे फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रावर जी सारखी संकटे येतात, कधी पुराचं, कधी वादळ तर कधी अतिवृष्टी आहे, यातूनही आमच्या शेतकऱ्यांना मुक्ती मिळावी. शेतकऱ्याला बळ मिळावे आणि गणरायाने त्यांना आशीर्वाद द्यावा, अशी गणराया चरणी प्रार्थना आहे.

    मदिरालय सुरु मंदिर का नाही?

    या वेळी मंदिरांच्या मुद्द्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, मंदिरे सुरु करण्याची आमची मागणी केवळ यासाठी आहे की, आम्ही हिंदू आहोत, आमचे तेहतीस कोटी देव आहेत. सगळीकडे, जिथे आम्ही मानू तिथे देव आहे. पण त्यासोबत या मंदिरांवर अवलंबून असलेले लाखो लोक आहेत मंदिराबाहेर कुणी फुले, कुणी प्रसाद, कुणी उदबत्ती, कुणी हळद-कुंकु विकते.

    मंदिरांवर अवलंबून असलेले पुजारी, तिथले सेवक आहेत. या दोन वर्षाच्या काळात या सगळ्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. मदिरालय सुरु होऊ शकते तर मंदिर का नाही? असा सवाल करत ते म्हणाले की, सरकारने नक्की नियमावली लावावी. आज फक्त महाराष्ट्रातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे गणरायाने सरकारलाही सुबुद्धी द्यावी अशी, मागणी यावेळी फडणवीसांनी केली.