अखेर तिढा सुटणार? मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस या तत्वानुसार २९ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावांची निश्चिती करण्यात आली होती. त्या नंतर या 12 नावांची यादी राज्याचे मंत्री नवाब मलिक, अनिल परब व अमित देशमुख यांनी ६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यपालांना भेटून सुपूर्त केली होती.

    राज्यपाल नियुक्त बारा विधान परिषद आमदारांच्या निवडीचा तिढा अद्यापदी सुटलेला नाही. राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेल्या नावांच्या यादीला राज्यपालांनी मंजुर द्यावी यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे आता या भेटीनंतर तरी अखेर तिढा सुटणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    या आमदारांच्या नियुक्ती संदर्भात आपण राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री पुण्यात दिली होती. त्यानंतर या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. नऊ महिन्यांहून अधिक काळ जाऊन अद्यापही राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यपालांनी यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन हा तिढा सोडवावा अशी विनंती करण्यात आली.

    राज्यपालांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आम्ही राज्यपालांना भेटून १२ आमदारांची नियुक्ती करण्याबाबत विनंती केली. या भेटीनंतर आम्हाला अपेक्षा आहे की ते लवकरात लवकर निर्णय घेतील.”

    दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस या तत्वानुसार २९ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावांची निश्चिती करण्यात आली होती. त्या नंतर या 12 नावांची यादी राज्याचे मंत्री नवाब मलिक, अनिल परब व अमित देशमुख यांनी ६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यपाल यांना भेटून सुपूर्त केली होती. मात्र, ६ नोव्हेंबर २०२० ते 2 सप्टेंबर 2021 दहा महिने होत आले तरी राज्यपालांकडून या नावांना अद्याप मंजूरी देण्यात आलेली नाही.