दुर्घटना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेची नवी सिस्टीम; मोबाईल ॲप घेणार गॅस गळतीची शोध

मुंबई : गॅस सिलेंडर गळतीमुळे मुंबईत सातत्याने आगीच्या घटना घडत असून यात अनेकांना जीव गमवावा लागतो आहे. त्यामुळे गॅस गळती होऊन होणा-या दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेने ॲप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. याची प्रक्रियाही सुरु झाली आहे.  या ॲपद्वारे कोणत्या ठिकाणी गॅस गळती आहे, याची माहिती मिळेल.

ॲपद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे गॅस दुर्गंधी येणारा गॅस कोणता हे समजणार आहे. या माहितीच्या आधारे संबंधित कंपनी व आपत्कालीन यंत्रणेकडून उपाययोजना करणे शक्य होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत गॅस गळतीचा दुर्गंधी येत असल्याचे प्रकार वाढले आहेत. गॅस गळतीचा दुर्गंधी आल्यावर  लोक घरे रिकामे करून धावाधाव करतात. काही दिवसांपूर्वी लालबाग येथील एका लग्न घरात गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात १६ जण जखमी झाले. यातील आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू  झाला.

अशा घटना मुंबईत सातत्याने घडत असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मुंबईत दाटीवाटीने वसाहती वसल्या आहेत. त्यामुळे आग लागल्यास तेथे पोहचण्यासाठी अग्निशमन दलाला कसरत करावी लागते. अनेकवेळा गॅस गळतीकडे रहिवाशांकडून दुर्लक्ष केले जाते. नुकत्याच घडलेल्या लालबाग येथील घटनेनंतर हलगर्जीपणा समोर आला आहे. त्यामुळे अशा घटनांना आळा बसण्यासाठी पालिकेने सिस्टीम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अॅप तयार केले जाणार आहे.

या ॲपद्वारे कोणत्या ठिकाणी गॅस लिकेज आहे हे समजणार आहे. माहिती मिळाल्यावर तातडीने संबंधित यंत्रणा, गॅस एजन्सीलाही याची माहिती दिली जाईल. त्यामुळे गॅस गळतीमुळे होणारा संभाव्य धोका टाळता येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.