पदवी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ; मुंबई जिल्ह्यात सर्वाधिक १९ टक्के घट

मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विविध कॉलेजांमध्ये यंदा सुमारे २० टक्के प्रवेश कमी झाल्याचे उघड झाले आहे. सर्वाधिक फटका कला शाखेला बसल्याचे समोर आले आहे. मुंबई विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा शुक्रवार आणि शनिवार पार पडली. शनिवारी अधिसभा सदस्य प्रा. आरती प्रसाद यांनी ही बाब समोर आली.

    मुंबई : कोरोनामुळे मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सात जिल्ह्यांपर्यंत यंदा २० टक्के कमी प्रवेश झाल्याची बाब समोर आली आहे. याबाबत विद्यापीठाने योग्य ती खबरदारी घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी विद्यापीठाच्या अधिसभेत करण्यात आली.

    मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विविध कॉलेजांमध्ये यंदा सुमारे २० टक्के प्रवेश कमी झाल्याचे उघड झाले आहे. सर्वाधिक फटका कला शाखेला बसल्याचे समोर आले आहे. मुंबई विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा शुक्रवार आणि शनिवार पार पडली. शनिवारी अधिसभा सदस्य प्रा. आरती प्रसाद यांनी ही बाब समोर आली.

    याबाबत त्यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबई शहर विभागात मागील वर्षीच्या तुलनेत १९ टक्के प्रवेश कमी झाल्याचे समोर आले. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात १७.७ टक्के कमी प्रवेश, रायगड जिल्ह्यातील कॉलेजांमध्ये १५ टक्के कमी प्रवेश झाल्याचे उघडकीस आले.

    या संपूर्ण वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ हजार ७३९ प्रवेश कमी झाल्याचे प्रा. आरती यांनी सांगितले. शैक्षणिक वर्ष २०१९-२० या शैक्षणिक वर्षात विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सात जिल्ह्यांमध्ये दोन लाख २३ हजार ९२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. शैक्षणिक वर्ष २०२०-२१मध्ये एक लाख ८७ हजार १८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे समोर आले आहे.

    याबाबत प्रा. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोरोनाकाळात प्रवेश घेताना आलेल्या समस्या मांडल्या. याचबरोबर विद्यार्थ्यांना केवळ पैसे नाही म्हणून प्रवेश घेता आला नाही याची माहितीही दिली. यानंतर झालेल्या चर्चेत विद्यापीठ प्रशासनाने याबाबतचा अभ्यासकरून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.