महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवून जलक्रांती घडवू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त जलसंपदा, जलसंधारण व पाणी पुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ.शंकररावजी चव्हाण जलभूषण पुरस्कार वितरण प्रसंगी सह्याद्री अतिथीगृह येथे ते बोलत होते.

    मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवून जलक्रांती घडवू, पाण्याचा विनियोग चांगल्या पद्धतीने करावा लागेल, हाच जलसाक्षरतेचा अर्थ आहे. शरीरात जसे रक्तवाहिन्यांचे जाळे असते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला अतिरिक्त ठरणारे, वाहून जाणारे पाणी थांबवावे लागेल. ते वळवावे लागेल. त्यातून जलक्रांती होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

    दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त जलसंपदा, जलसंधारण व पाणी पुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ.शंकररावजी चव्हाण जलभूषण पुरस्कार वितरण प्रसंगी सह्याद्री अतिथीगृह येथे ते बोलत होते.

    संसाधनाचे बळकटीकरण करावे लागेल       

    मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, किनारपट्टी भागात समुद्राच्या पाण्यातून गोडे पाणी उपलब्ध करणे, तसेच मराठवाडा व विदर्भातील परिसरासाठी पाणी वळवण्याचा पर्याय उपयोगात आणावा लागेल. भावी पिढ्यांसाठी आपल्याला पाण्याचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल.

    राज्यातील वाया जाणारे पाणी, समुद्राच्या पाण्याचा उपयोग अशा अनेक गोष्टींवर विचार करावा लागेल. इस्त्रायल सारख्या देशात खारे पाणी गोडे करून वापरण्याचे तंत्रज्ञान वापरले जाते. आपल्याकडेही हे तंत्रज्ञान विकसित करत आहोत. नवीन धरणापेक्षा आहे त्या संसाधनाचे बळकटीकरण करावे लागेल. त्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    लोकचळवळीचे स्वरुप येवो

    राज्याच्या जलक्रांतीचे जनक दिवंगत शंकररावजी चव्हाण यांच्या जयंती निमित्त जलक्रांतीचे कार्य पुढे नेणाऱ्या मान्यवरांचा जलभूषण पुरस्कार देऊन सन्मान होत आहे. निश्चितच ध्येयवेड्या जलमित्रांचा, जलक्रांतीसाठी झपाटलेल्या कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे. जलक्रांतीची ही चळवळ झपाट्याने लोकांपर्यंत पोहोचवून यास लोकचळवळीचे स्वरुप येवो, अशा अपेक्षा व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांपर्यंत शुद्ध पाणी पोहोचणे आवश्यक आहे त्यासाठी सर्वांनी जलसाक्षर होऊया, असे आवाहन केले.

    महाराष्ट्राची तहान भागविण्याचे काम

    दिवंगत डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या नावाने दिला जाणारा हा जलभूषण पुरस्कार आहे. हा पुरस्कार जलसंपदा विभागामार्फत देण्यात येत आहे त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विभागाचे आभार मानले. १२ वर्ष जलसंपदा विभागाचे मंत्री म्हणून दिवंगत डॉ. शंकरराव यांनी काम केले. पाण्याचे महत्व त्यांनी ओळखले. त्यांनी त्यावेळी उभारलेल्या उत्तम प्रकल्पाची फळे आज आपल्याला मिळत आहे.

    महाराष्ट्राची तहान भागविण्याचे काम झाले, हे सर्व करताना यात सर्वांचे संयुक्त योगदान राहिले. असेही चव्हाण म्हणाले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलभूषण पुरस्कार-2020 चे वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार विजेते कै. सुनिल पोटे (नाशिक), द्वितीय पुरस्कार अनिकेत लोहिया (अंबाजोगाई), तर तृतीय पुरस्कार प्रवीण महाजन (नागपूर) यांना मिळाला आहे. अनुक्रमे रुपये पाच लाख, तीन लाख व दोन लाख, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कै.सुनिल पोटे यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नी श्रीमती मनीषा पोटे यांनी स्विकारला. श्रीमती पोटे यांनी पुरस्कार्थींच्या वतीने यावेळी मनोगत व्यक्त केले.