शिक्षकांना दिलेल्या सहाय्यक आयुक्तांच्या पत्राला केराची टोपली, पोलिसांना हवे फक्त आयुक्तांचेच पत्र

मुंबई: कोरोना लढ्यात कॉन्टॅक्ट ट्रॅकिंग, क्वारंटाईन सेंटर व वस्त्यांमध्ये जाऊन औषधांचे वाटप करण्यासाठी महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांची मदत घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला

 मुंबई: कोरोना लढ्यात कॉन्टॅक्ट ट्रॅकिंग, क्वारंटाईन सेंटर व वस्त्यांमध्ये जाऊन औषधांचे वाटप करण्यासाठी महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांची मदत घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी सर्व शिक्षकांना प्रवासाची परवानगी देणाऱ्या सहाय्यक आयुक्तांच्या स्वाक्षरीच्या पत्राला पोलिसांकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

शिक्षक अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने तुम्हाला सोडता येऊ शकत नाही, त्यामुळे आयुक्त किंवा गृह खात्याची परवानगी असलेले पत्र आणा, असे सांगत शिक्षकांना पोलिसांकडून पुन्हा घरी पाठवण्यात येत आहे.त्यामुळे एकीकडे तातडीने हजर राहण्याचे आदेश असताना दुसरीकडे पोलीस पाठवत नसल्याने शिक्षकांची अवस्था बिकट झाली आहे. 

कोरोनाच्या कामामध्ये शिक्षकांची मदत घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या शाळेची जबाबदारी, वस्ती व सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या गोळ्यांचे वाटप करणे, झोपडपट्टीतील नागरिकांचे कॉन्टॅक्ट ट्रॅकिंग करणे यासारख्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच शाळेचा उपस्थिती अहवाल सादर करण्यासाठी शिक्षकांना तातडीने शाळेत हजर राहण्याचे आदेश दिले. मुंबईतील बहुतांश शिक्षक हे नवी मुंबई, ठाणे, कल्याण, मिरारोड, वसई, विरार या परिसरातून येत असल्याने त्यांना प्रवासासाठी परवानगी देणारे सहाय्यक आयुक्तांच्या स्वाक्षरीचे पत्र पालिकेच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना पाठवले आहे. हे पत्र घेऊन शिक्षक शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडले. परंतु नाक्यावरच त्यांना पोलिसांकडून अडवण्यात येत आहे. यावेळी शिक्षकांकडून सहायक आयुक्तांचे पत्र दाखवण्यात आल्यानंतर सहायक आयुक्तांचे पत्र चालणार नाही. तर फक्त पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा गृह खात्याचेच पत्र असल्यास सोडण्यात येईल, असे शिक्षकांना सांगण्यात येत आहे. तसेच नवी मुंबई, ठाणे, कल्याण, मिरारोड, वसई, विरार येथून मुंबईमध्ये येणाऱ्या हॉस्पिटलमधील कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील पालिका कर्मचारी यांच्यासाठी बेस्टची बस सेवा सुरू केली आहे. या बसमधून मुंबईकडे येण्यासाठी काही शिक्षक बसपर्यंत पोहचले असता त्यांना बेस्ट प्रशासनाकडून बसमध्ये प्रवेश दिला जात नाही. तुमच्या प्रमुखांना तुमच्यासाठी बसची व्यवस्था करण्यास सांगा असे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ऐकवण्यात येत आहे. 

एकीकडे पालिका प्रशासनाने तातडीने हजर राहण्याचे आदेश दिले असताना दुसरीकडे शाळेत जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही तर शिक्षण विभागाने दिलेल्या सहाय्यक आयुक्तांच्या पत्राला पोलिसांकडून केराची टोपली दाखवली जात आहे.शाळेत न गेल्यास प्रशासनाकडून कारवाईची भीती तर पोलिसांकडे जाण्यासाठी हट्ट धरला तर चोप बसण्याची भीती यामुळे शिक्षकांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. पोलीस व बेस्ट प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने अनेक ठिकाणी त्यांच्यामध्ये खटकेही उडत आहेत. त्यामुळे आता पालिका प्रशासनाने शाळेत जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी किंवा आयुक्तांचे पत्र द्यावे अशी मागणी शिक्षकांकडून केली जात आहे.