गर्भाशय निकामी करणाऱ्या ट्यूमरच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेला जीवनदान! ; अडीच तासांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर काढले ट्यूमर

शस्त्रकिया करताना फारसा रक्तस्रावही झाला नाही. या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही दिवसांतच पायाला रक्तपुरवठा होऊ लागल्याने पायामध्ये संवेदना निर्माण होण्यास सुरुवात झाल्याचे रेहानाने सांगितले. त्याचप्रमाणे अर्धांगवायूमुळे अनेक वर्षे अंथरुणावर असल्याने माझ्या पाठीला बेडसोल झाले होते. मात्र त्यावरही रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी मला चांगल्या प्रकारे सुविधा दिली. त्यामुळे बेडसोलचा त्रासही कमी झाल्याचे रेहाना यांनी सांगितले.

  मुंबई:अर्धांगवायूमुळे पाठीचा कणा निकामी झाल्याने कमरेपासून खालील शरीर लुळे पडलेले… त्यातच अडीच वर्षांपासून पोटात ट्यूमरचा त्रास सुरू झाल्याने रेहाना परवीन शेख अनेक िदवसांपासून अंथरुणावर पडूनच असतं. गतवर्षी लॉकडाऊनपूर्वी ट्यूमरचा त्रास अधिकच वाढला. मात्र सात ते आठ रुग्णालयांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिल्याने अखेर जे.जे. रुग्णालयात रेहानावर नुकतीच ट्यूमरची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ट्युमर काढल्यामुळे नवीन जीवदान मिळण्याबरोबरच थांबलेला रक्तपुरवठा पूर्ववत होऊन त्यांच्या पायांमध्ये ताकद येण्यास मदत झाली आहे.

  मुंब्रा येथे राहत असलेल्या रेहाना परवीन शेख (वय ४३) हिला १९९८ मध्ये आलेल्या तापामुळे तिचे दोन्ही पायू लुळे पडले होते. त्यावेळी उपचारामुळे वर्षभरामध्ये ती आधाराने चालू लागली होती. मात्र काही वर्षांतच पुन्हा पुन्हा अर्धांगवायूचा झटका आला. त्यावेळी ती पूर्णत: अंथरूणाला खिळली. त्यातच तिला २०१९ मध्ये तिच्या पोटामध्ये ट्यूमर असल्याचे डॉक्टरांच्या निदानातून समोर आले. पोटातील ट्युमरमुळे तिच्या पायांपर्यंत रक्त पोहोचत नव्हते. त्यामुळे पायांवर होणाऱ्या उपचारांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. ट्यूमरसंदर्भात शस्त्रक्रिया करण्यासाठी रेहानाच्या कुटुंबियांनी कूपर रुग्णालयात धाव घेतली. मात्र त्यांनी केईएम रुग्णालयात पाठवले. केईएममध्ये पोटातील ट्यूमर कर्करोगाचा आहे का याच्या तपासणीसाठी टाटा रुग्णालयात पाठवले. तेथून पुन्हा केईएम त्यानंतर बॉम्बे, बॉम्बे रुग्णालय, नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालय अशा फेऱ्या त्यांच्या कुटुंिबयांच्या सुरू झाल्या. मात्र कोणत्याच रुग्णालयामध्ये तिच्या ट्यूमरवर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. गेल्या वर्षी काेराेनामध्ये रेहानाला ट्यूमरचा त्रास वाढल्याने तिने सात ते आठ रुग्णालयांमध्ये फेऱ्या मारल्यानंतर अपयश हाती आले. त्यानंतर अखेर त्यांनी जे.जे. रुग्णालय गाठले.

  रेहाना शेख, रुग्ण

  जे.जे. रुग्णालयातील महिला व प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉ. राजश्री कटके यांनी तिच्या सर्व तपासणी केल्या. ट्युमरमुळे रेहानाच्या पोटातील आतड्या, मूत्रपिंड, यकृत आणि गर्भाशयाच्या पिशवीवर प्रचंड ताण पडला होता. तसेच ट्यूमरला सहा ते सात पीळ पडलेले होते. ट्यूमरमुळे शरीरात निर्माण होणारे रक्त रेहानाच्या पायापर्यंत पोहचत नव्हते. ट्युमरमुळे अन्य अवयवांना होणारा त्रास लक्षात घेऊन डॉ. कटके यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र रेहानाच्या लुळ्या पडलेल्या पायामुळे शस्त्रक्रिया करताना अडचणी येत होत्या. पाय सरळ होत नसल्याने ट्युमर काढणे अवघड झाले होते. डॉ. राजश्री कटके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन ते अडीच तास शस्त्रक्रिया करत त्यांनी रेहानाच्या पोटातून अडीच किलोचा ट्युमर यशस्वीरित्या बाहेर काढला.

  शस्त्रकिया करताना फारसा रक्तस्रावही झाला नाही. या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही दिवसांतच पायाला रक्तपुरवठा होऊ लागल्याने पायामध्ये संवेदना निर्माण होण्यास सुरुवात झाल्याचे रेहानाने सांगितले. त्याचप्रमाणे अर्धांगवायूमुळे अनेक वर्षे अंथरुणावर असल्याने माझ्या पाठीला बेडसोल झाले होते. मात्र त्यावरही रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी मला चांगल्या प्रकारे सुविधा दिली. त्यामुळे बेडसोलचा त्रासही कमी झाल्याचे रेहाना यांनी सांगितले.

  गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
  भूलतज्ज्ञ डॉ. सुकृती अतराम यांनी रेहाना यांना भूल देण्याचे काम चोखपणे पार पाडल्याने शस्त्रक्रिया सुलभरित्या करणे शक्य झाले. रेहानाच्या पोटातील ट्यूमर शस्त्रक्रिया करून काढणे किचकट असल्याने अनेक डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. मात्र यापूर्वी केलेल्या अवघड शस्त्रक्रियेच्या अनुभवामुळे रेहानाची किचकट शस्त्रकिया करणे शक्य झाले.
  -डाॅ. राजश्री कटके (प्रमुख महिला व प्रसुती विभाग, जे.जे. रुग्णालय)

  शस्त्रक्रियेनंतर नव जीवनदान मिळालं !
  पोटात असलेल्या ट्युमरमुळे पायाला रक्त पोहोचत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर मला धक्काच बसला होता. माझे पाय लुळे असल्याने कोणत्याच रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जात नव्हती. माझ्या पायामध्ये पुन्हा ताकद येईल याची मी अपेक्षा सोडून दिली होती. पण जे.जे. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करून मला जीवदान दिले आहे. शस्त्रक्रियेनंतर माझ्या पायात जाणीवा निर्माण झाल्या आहेत.
  – रेहाना शेख, रुग्ण

  रुग्णांना उत्तम सुविधा देण्यासाठी आमचे डॉक्टर नेहमीच प्रयत्नशील असतात. महिला व प्रसुती विभागाच्या प्रमुख डॉ. राजश्री कटके यांच्या अनुभवाचा रुग्णांना नेहमी फायदा होत आहे. त्याच्या अनुभवामुळे त्या किचकट शस्त्रक्रिया करून रुग्णांना दिलासा देत आहेत. ही बाब जे.जे. रुग्णालयासाठी भूषणावह आहे.

  - डॉ. रणजित माणकेश्वर, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय