मागील दहा महिन्यांपासून सर्वसामान्य मुंबईकर ज्या घोषणेच्या प्रतिक्षेत आहेत ती घोषणा आता लवकरच होणार

मुंबई : मार्च मध्ये लॉकडाऊन जाल्यापासून मुंबईची लोकल सेवा बंद करण्यात आली. यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत काही ठराविक प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आली. मात्र, मागील दहा महिन्यांपासून सर्वसामान्य मुंबईकर आणि लोकल प्रवासी ज्या घोषणेच्या प्रतिक्षेत आहेत ती घोषणा आता लवकरच होणार आहे. १५ डिसेंबर नंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल ट्रेन सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी मुंबईची लोकल ट्रेन बंद करण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परंतु सर्वांसाठी लोकल प्रवास कधी सुरू होणार हा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिवाळी नंतर कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन लोकल सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे म्हटले होते.

१५ डिसेंबर पर्यंत कोरोना संसर्गाचा आकडा स्थिर राहिल्यास मुंबईतील लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या मुंबईतील कोरोना संसर्गाचा आकडा जवळपास स्थिर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे १५ डिसेंबर नंतर सर्वांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याच्या दृष्टीने लवकरच प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

१० ते १२ डिसेंबरदरम्यानच्या महत्वाच्या बैठकीत यासंबधीचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांसाठी लोकल ट्रेनची प्रतिक्षा लवकरच संपणार असल्याचे चिन्ह आहेत.