महाविकास आघाडीचे सरकार पुढील २५वर्ष चालेल : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा!

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर मी राज्यात करेक्ट कार्यक्रम करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचारा दरम्यान म्हटले होते. भाजपचा विजय झाल्याने आता 'ऑपरेशन लोटस' मोहीम हाती घेतली जाणार का, अशा राजकीय चर्चांना उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

    मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जोपर्यंत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत सरकारला काही होणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार पुढील २५ वर्ष चालेल,’ असा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

    पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर मी राज्यात करेक्ट कार्यक्रम करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचारा दरम्यान म्हटले होते. भाजपचा विजय झाल्याने आता ‘ऑपरेशन लोटस’ मोहीम हाती घेतली जाणार का, अशा राजकीय चर्चांना उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

    भुजबळ यांची माफी मागावी

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रकरणात जून महिन्यात कोर्टात विचारणा याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच भुजबळ हे जामिनावर बाहेर असल्याने त्यांनी जपून बोलावे, असा गर्भित इशाराही पाटील यांनी दिला. या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांची माफी मागावी, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

    ईडी, सीबीआय आणि एनआयए यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या खिशात आहेत. ते हवे तेव्हा कोणाचीही चौकशी लावतात. मात्र आता न्यायालयेही त्यांच्या खिशात गेली की काय, अशी शंका येण्यासारखे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

    ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ