एका दिवसात महाराष्ट्रात २५ हजार कोरोना रुग्ण; १५ हजार रुग्णांपैकी ४०० गंभीर

गुरुवारी राज्याने दैनंदिन कोरोना रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या गाठली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये सर्वाधिक २४ हजार ८९६ रुग्ण एक दिवसात आढळले होते. आज २५ हजार ८३३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. नागपूर, औरंगाबाद, अमरावतीसह अनेक शहरांमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, तरीही दैनंदिन बाधितांची संख्या आपले जुने विक्रम मोडीत काढत आहे.

  मुंबई : गेल्यावर्षी जगभरात कहर माजविणाऱ्या कोरोनाने महाराष्ट्राला पुन्हा आपल्या मगरमिठीत घेतले आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होत चालली आहे. यामुळे राज्य सरकारसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

  गुरुवारी राज्याने दैनंदिन कोरोना रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या गाठली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये सर्वाधिक २४ हजार ८९६ रुग्ण एक दिवसात आढळले होते. आज २५ हजार ८३३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. नागपूर, औरंगाबाद, अमरावतीसह अनेक शहरांमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, तरीही दैनंदिन बाधितांची संख्या आपले जुने विक्रम मोडीत काढत आहे. गुरुवारी राज्यात २३ हजारापेक्षा जास्त नव्या रुग्णांची भर पडली.

  मृत्यूदरात महाराष्ट्र देशात दुसरा

  देशात कोरोनाबाधितांच्या मृत्यूदरात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी आहे. १७ मार्चपर्यंत राज्यात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर २.२६ आहे. तर, देशभरातील मृत्यूदराचा आकडा १.३९ टक्के आहे. याशिवाय महाराष्ट्रापेक्षा जास्त मृत्यू दर पंजाबमध्ये आहे, तर सर्वात कमी मृत्यूदर महाराष्ट्राला लागून असलेल्या दादरा नगरहवेलीमध्ये  ०.०६ टक्के आहे.

  १५ हजार रुग्णांपैकी ४०० गंभीर – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

  राज्यातील १५ हजार कोरोनाबाधित रुग्णांपैकी गंभीर रुग्णांचे प्रमाण ४०० एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात पुन्हा लॉकडाऊन न लावता कडक निर्बंध लावले जातील, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ही चिंतेची बाब असून कोविड नियंत्रण उपयोजना सुरू आहे. राज्यात लवकरच कडक निर्बंध लावले जाणार आहे. राज्य सरकार लवकरच नवीन नियामवली जाहीर करणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

  गर्दी नियंत्रित करण्यासाठी विविध उपाय योजनावर चर्चा सुरू आहे, कोविड संदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेस करणे हे राज्य सरकार पुढे आव्हान आहे. कुठेही बेड कमी नाहीत. खाजगी ठिकाणी एखाद्या हॉस्पिटलमध्ये अडचण असेल. राज्यात ८५ टक्के ए सिमटोमॅटिक रुग्ण आहेत. रोज ३ लाख लसीकरणाचे लक्ष आहे. लसीकरणासाठी १०० बेडच्या रुग्णालयाची अट शिथिल करून ५० किंवा २५ करावी अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे, असेही टोपे यांनी सांगितले.

  गोव्यात पर्यटकांवर बंदी घालण्याची तयारी

  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पर्यटकांवर बंदी घालण्याचे संकेत दिले आहे. तूर्त पर्यटकांना राज्यात प्रवेश दिला जात आहे. पुढील स्थिती पाहता, शेजारच्या राज्यांतून येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे या राज्यांतून येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालण्याचे आवाहन सरकारला केले होते. मात्र, सध्या सरकारने तसा निर्णय घेतलेला नाही.

  पंजाबमध्ये अनिश्चित काळापर्यंत ‘नाईट कर्फ्यू’

  पंजाबमध्ये कोरोना संक्रमणाचा वाढता वेग लक्षात घेता गुरुवारी सकाळीमुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी संपूर्ण राज्यात ‘नाईट कर्फ्यू’ लावण्याची घोषणा केली. नाईट कर्फ्यू रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत लागू राहील. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत राज्यता रात्रीची संचारबंदी सुरु राहील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पंजाबमधील नव्या रुग्णसंख्येने गेल्या वर्षीचे विक्रम मोडीत काढण्याकडे वाटचाल सुरू केल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एका दिवसात २, ०७६ नवीन रुग्ण आढळले होते. आता मार्च महिन्यात या आकड्याच्या जवळपास नवीन रुग्णांची संख्या पोहचल्याचे दिसत आहे. तर बुधवारपर्यंत पंजाबमध्ये ६,१७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.