कोरोनाच्या  लसीकरणासाठी महराष्ट्राचे प्रशासन सज्ज : राजेश टोपे

केंद्राच्या परवानगीनंतर पहिला प्रयोग मुंबईतील केईएम रुग्णालयात

मुंबई : कोरोनाच्या लसीकरणासाठी महराष्ट्राचे प्रशासन सज्ज झाले आहे. तशी माहिती बुधवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्राच्या धर्तीवर राज्यातही लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून आता फक्त केंद्राच्या परवानगीकडे लक्ष आहे, असे टोपे म्हणाले.

राज्यातील लसीकरणाचा पहिला प्रयोग मुंबईतील केईएम रुग्णालयात केला जाणार आहे. करोना प्रतिबंधात्मक लस संपूर्ण राज्यभरात पोहोचवण्यासाठी सर्व कामं पूर्ण झाली आहेत. आता केंद्र सरकार आणि औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची आम्ही वाट पाहत आहोत, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

कोल्ड चेनची व्यवस्था करण्याची गरज
पुढे ते म्हणाले की, प्रत्येक राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने वाहतूक आणि कोल्ड चेनची व्यवस्था करण्याची गरज आहे. ते काम अत्यंत जलद गतीने महाराष्ट्रात सुरु आहे. अदर पूनावाला यांनी देखील महाराष्ट्रात कोल्ड चेन, प्रशिक्षण आणि वाहतुकीबद्दल जे टार्गेट दिले होते ते त्यांनी पूर्ण केले असल्याचे सांगितले आहे, असे टोपे म्हणाले.

तरूणांना रक्त दान करण्याचे आवाहन
राजेश टोपे यांनी यावेळी बोलताना राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याची माहिती दिली आहे. तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. ते म्हणाले की, राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. लॉकडाउनच्या काळात अनेक महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था बंद होत्या. त्यामुळे रक्तदान शिबिरे होऊ शकली नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी रक्तदान करावे. १२ डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने रक्तसाठ्याचा तुटवडा भरुन काढता येईल.

- राजेश टोपे, आरोग्य मंत्री.