tb patient

क्षयरोगावर(TB)नियंत्रण मिळविण्यसाठी राज्य आरोग्य विभाग चांगलीच कसरत सुरु आहे. विविध उपाययोजनाच्या माध्यमातून क्षयरोग नियंत्रण कार्य क्रम राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविला जात असल्याची माहिती गुरुवारी आरोग्य विभागाने दिली.

  मुंबई : कोविड- १९(Covid-19) महामारीचा क्षयरोग कार्यक्रमावर परिणाम झाला असल्याचे समोर आले आहे. तरीही क्षयरोगावर(TB)नियंत्रण मिळविण्यसाठी राज्य आरोग्य विभाग चांगलीच कसरत सुरु आहे. विविध उपाययोजनाच्या माध्यमातून क्षयरोग नियंत्रण कार्य क्रम राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविला जात असल्याची माहिती गुरुवारी आरोग्य विभागाने दिली.

  एकीकडे, कोविड-१९ च्या चाचण्यांसाठी क्षयरोग निदान यंत्रांचा, सीबीएनएएटी (जेनएक्स्पर्ट आणि ट्रूनॅट) यांचा वापर करण्यात आला. मनुष्यबळ आणि निदान उपकरणांचा वापर कोविड-१९ ला सामोरे जाण्यासाठी करण्यात आल्यामुळे क्षयरोग सेवांवर बराच परिणाम जाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, नोंदणी झालेल्या क्षयरुग्णांच्या संख्येत बऱ्यापैकी घट झाली आहे.कोविडपूर्व काळात महाराष्ट्रात दर महिन्याला सरासरी १९ हजार क्षयरुग्णांची नोंद होत होती, ती कमी होऊन एप्रिल २०२१ मध्ये १०,०३६ रुग्णांची नोंद झाली आहे.

  याबाबत राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या आणि आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले की, “कोविड १९ चा क्षयरोग उपचारसेवांवर झालेला परिणाम आणि नोंदींमध्ये झालेली घट यांची दखल घेत क्षयरोगासंबंधीच्या सेवा सुरू राहतील याची खातरजमा करण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण धोरणे विकसित केली गेली आहेत आणि त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

  रुग्णांना घरपोच औषधे पोहचवणे, क्षयरोगाच्या निदानासाठी मदत मिळावी यासाठी खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांशी भागीदारी, सामाजिक स्तरावर सहभाग या उपाययोजना राबवण्यात आल्या. त्याचप्रमाणे द्वि-दिशात्मक तपासण्यांसह महत्त्वाची धोरणे राबवण्यात आली, जेणेकरून प्रत्येक क्षयरुग्ण आढळला जाईल आणि त्याची या कार्यक्रमात नोंद करण्यात येत आहे.

  भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत अशा कोविड-१९ क्षयरोग आणि इन्फ्लुएंजासारखे आजार (आयएलआय) आणि गंभीर स्वरुपाचे श्वसनाचे संसर्ग (एसएआरआय) झालेल्या व्यक्तींची तपासणी करण्यासाठी ऑक्टोबर २०२० आणि एप्रिल २०२१ या कालावधीत ४,६७,०३२  हून अधिक रुग्णांची क्षयरोग तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५,२६४ व्यक्तींना क्षयरोग असल्याचे निदान झाले आणि त्यांच्यापैकी ९६ % व्यक्तींवर उपचार सुरू करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

  डिसेंबर २०२० मध्ये राबवण्यात आलेल्या एसीएफ अभियानांतर्गत ८ कोटींहून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. ३.३३ लाख संभाव्य क्षयरुग्ण निश्चित केले आणि जानेवारी २०२१ पर्यंत १२,८२३ क्षयरुग्णांचे निदान करण्यात आले. तसेच, जिल्हा क्षयरोग फोरम स्थापन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

  २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त महाराष्ट्र

  क्षयरोगाचे नियंत्रण आणि निर्मूलन यासाठी नावीन्यूपर्ण धोरणांची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र क्षयरोग कार्यक्रम आघाडीवर आहे. खासगी वैद्यकीय क्षेत्राचा सहभाग, समुदायाचा सहभाग आणि जाणीवजागृती यांबाबत आमचा अनुभव क्षयरोग आणा कोविड-१९ शी संयुक्तपणे लढा देताना आम्हाला कामी येत आहे. महत्त्वाच्या उपक्रमांच्या अंमलबजावणीमुळे आम्ही लवकरच हा कार्यक्रम कोविडपूर्व पातळीवर आणू शकू आणि २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे ध्येय गाठू शकू, असा आम्हाला विश्वास आहे, असे महाराष्ट्राचे राज्य क्षयरोग अधिकारी डॉ. अडकेकर यांनी सांगितले.