“कंगनाला मुंबई आणि महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही,” गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

मुंबई : एखाद्याला मुंबईत(Mumbai) सुरक्षित वाटत नसेल तर त्यांना मुंबईत तसंच महाराष्ट्रात (Maharashtra) राहण्याचा अधिकार नाही असं राज्याचे गृहमंत्री (state home minister) अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी म्हटलं आहे. एखाद्या कलाकाराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हास्यास्पद आहे असंही ते म्हणाले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. पोलिसांच्या हाती मुंबई सुरक्षित आहे असं अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

“मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी होत असते. अतिशय सक्षमपणे मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस काम करत असतात. अशा परिस्थितीत एखाद्या कलाकाराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हास्यास्पद आहे. आज मुंबई तसंच महाराष्ट्र पोलिसांच्या हाती मुंबईत सुरक्षित आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीही ते सक्षम आहेत. जर मुंबई, महाराष्ट्र सुरक्षित नाही असं वाटत असेल तर त्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही,” असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, “पाकिस्तानव्याप्त काश्मीर म्हणणं हा मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. ही मुंबईत १०६ हुतात्म्यांनी मिळवली आहे. मुंबईचं रक्षण सातत्याने आपल्या पोलिसांनीच केलं आहे. २६/११ चा दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस शहीद झाले. कसाबला मुंबई पोलिसांनी पकडलं. १९९२ च्या दंगलीत मुंबईचे पोलीस शहीद झाले. मुंबई पोलिसांनीच लोकांना वाचवलं. अशा मुंबई पोलिसांवर कोणतेही ऐरेगैरे लोक ज्यांचा मुंबईशी संबंध नाही अशी वक्तव्यं करत असतील तर राज्य सरकारनं, गृहमंत्रालयानं कठोर कारवाई केली पाहिजे”. हे मुंबई पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याच मोठं कारस्थान दिसत आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.