बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे. यानंतर आता राजकारण चांगलचं रंगू लागलं आहे. महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर (Ajay Singh Sengar) यांनी पाठराखण केली आहे.

द्विभार्या प्रतिबंधक कायदा धनंजय मुंडे यांना लागू होऊ शकत नाही. त्यांनी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नाही. मुस्लीम व्यक्ती ४ विवाह करू शकतात मग हिंदू व्यक्तीने दुसरं लग्न केलं तर काय चुकलं? असा सवाल महाराष्ट्र करणी सेनेचे अजय सिंह सेंगर यांनी उपस्थित केला आहे.

राज्यघटना सगळ्यांनाच समान आहे. द्विभार्या प्रतिबंधक कायदा निरर्थक ठरला आहे. सर्व धर्मांना विवाहाचे वेगवेगळे बंधन असू शकत नाही. फक्त हिंदू धर्मालाच द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होणार नाही असं सेंगर यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत पहिल्या पत्नीपासून सुख मिळत नसेल तर मुस्लिमांप्रमाणे दुसरं लग्न करू शकतात, मुस्लीम लोक ४-४ विवाह करतात, मग हिंदूने दुसरं लग्न केले तर चुकीचं काय? अशी प्रतिक्रिया त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

रेणु शर्मा नावाच्या महिलेने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, तक्रारदार महिलेची बहिण करुणासह परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली आहे.