काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर नाना पटोले यांचा मेगा प्लान; अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार

    मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देवून राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर नाना पटोले यांनी पक्षाची नवी रणनिती तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (२३ फेब्रुवारी) काँग्रेसच्या  संसदीय मंडळाची (पार्लमेंटरी बोर्ड) बैठक महिला विकास महामंडळ सभागृह, नरिमन पाईंट येथे होणार आहे. या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

    शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात आंदोलन व जनजागृती मोहिम राबविण्याबाबतही या बैठकीत रणनिती ठरवली जाणार आहे अशी माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.  या शिवाय राज्यातील आगामी ५ महानगरपालिका तसेच ९८ नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बांधणीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

    राज्यात होऊ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत ऐकट्याने जायचे की महाविकास आघाडीतील मित्र शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेस आघाडी करणार? याचे उत्तर देखील या बैठकीत मिळण्याची शक्यता आहे.

    या बैठकीत शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात आंदोलन व जनजागृती मोहिम, आंदोलन करण्याबाबत रणनिती ठरवली जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकार विरोधात राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कॉंग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलने करणार असून त्या आंदोलनात सर्वसामान्य जनतेला सहभागी करून घेण्यासाठीची रणनिती यावेळी ठरविली जाणार आहे.

    या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह निवड मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

    अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार

    राज्यातील आगामी ५ महानगरपालिका तसेच ९८ नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बांधणीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. नवी मुंबई शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, दुपारी १२ वा. कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, दुपारी २ वाजता वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटी व दुपारी ४ वा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेतली जाणार आहे.

    तर, गुरुवार दिनांक २५ रोजी औरंगाबाद ग्रामीण व शहर, भंडारा, गोंदिया व ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक होत आहे. शुक्रवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी यवतमाळ, चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेऊन संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला जाणार आहे तर संध्याकाळी ४ वाजता भिवंडी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.