बिहार निवडणुकांत रंगणार महाराष्ट्राचे युद्ध, शिवसेनेसोबत, राष्ट्रवादीही रिंगणात, फडणवीसांसमोर मोठे आव्हान

बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये (Bihar Elections) महाराष्ट्रातील मुद्दे रंगण्याची शक्यता आहे. सुशांतसिंह (Sushant Singh Rajput) प्रकरण हा निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा असेलच, पण त्याचबरोबर भाजपाने (BJP) निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केलेल्या देवेंद्र फडणवीसांना आणखी एका आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

 मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये (Bihar Elections) महाराष्ट्रातील मुद्दे रंगण्याची शक्यता आहे. सुशांतसिंह (Sushant Singh Rajput) प्रकरण हा निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा असेलच, पण त्याचबरोबर भाजपाने (BJP) निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केलेल्या देवेंद्र फडणवीसांना आणखी एका आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. शिवसेना (SHIV SENA) आणि राष्ट्रवादी काँग्रेसही (NCP) या निवडणबूक रिंगणात उतरले आहेत.

शिवसेनेचे आव्हान

अभिनेता सुशांतसिंह राजपूत हत्येच्या प्रकरणानंतर, या मुद्द्यावरुन राजकारण रंगले. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, यावरुन महाराष्ट्र आणि बिहार सरकार आमनेसामने आले. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. हा मुद्दा बिहार निवडणुकांत महत्त्वाचा ठरणार हे स्पष्ट झाले आहे. बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना आव्हान देण्याचे सूचित करत शिवसेनेने बिहारमध्ये ४० उमेदवार देण्याची घोषणा केली. मात्र गुप्तेश्वर पांडेंना संयुक्त जनता दलाने तिकीट दिले नाही. पोलीस महासंचालकपदाचा राजीनामा देत पांडे काही दिवसांपूर्वीच जेडीयूत सामील झाले होते. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊतांसह मोठे नेते या निवडणुकीत प्रचार करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही बिहार निवडणुकांत नशीब आजमावणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक प्रचारासाठी ४० स्टार प्रचारकांची यादीच तयार केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, सुनील तटकरे, फौजिया खान यांच्यासह उ. भारतीय नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. ही निवडणूक लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघआडीसोबत लढण्याची राष्ट्रवादीची इच्छा होती, मात्र यावरुन मतैक्य निर्माण न झाल्याने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस किती ठिकाणी उमेदवार देणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. बिहारमध्ये राष्ट्रवादीचा चेहरा पक्षाचे माजी खासदार तारिक अन्वर हे होते, मात्र ते आता काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले आहेत.

भाजपा-जेडीयूसमोर आव्हान

बिहारमध्ये संयुक्त जनता दलासोबत भाजपा एकत्रित निवडणुका लढवित आहे. बिहारच्या निवडणुकांची जबाबदारी प्रभारी म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादीचे आव्हान भाजपा-जेडीयू युतीसमोर असणार आहे. सुशांतसिंह प्रकरणांसोबतच इतरही राज्यातले काही मुद्दे बिहारच्या प्रचारात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादीचे उमेदवार हे भाजपा-जेडीयूच्या उमेदवारांचे नुकसान करतील, अशी शक्यताही राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.