गुजरातच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्राची बदनामी; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

वाझेंच्या प्रकरणाआड भाजपा खासदार मोहन डेलकर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात ईडी, एनआयएचा ससेमिरा लावला जात असून हे काही नवीन नाही. ज्याला कर नाही तर त्याला डर कशाला ही काँग्रेसची भूमिका असल्याने वाझे असो किंवा आणखी कुणी असो, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे नाना पटोले म्हणाले. 

    मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणापासून पद्धतशीरपणे महाराष्ट्राच्या बदनामीची मोहीम राबविली जात असून गुजरातच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्र भाजपाचे नेते हे काम करीत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.

    जगातील सर्वोत्तम पोलिसदलांपैकी एक असलेल्या मुंबई पोलिसांना खलनायक ठरविले जात आहे, असेही ते म्हणाले. भाजपाकडून महाराष्ट्र पोलिसांचा केला जात असलेला अपमान काँग्रेस कदापी सहन करणार नाही, असा इशाराही पटोले यांनी दिला.

    वाझेंच्या प्रकरणाआड भाजपा खासदार मोहन डेलकर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात ईडी, एनआयएचा ससेमिरा लावला जात असून हे काही नवीन नाही. ज्याला कर नाही तर त्याला डर कशाला ही काँग्रेसची भूमिका असल्याने वाझे असो किंवा आणखी कुणी असो, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे नाना पटोले म्हणाले.

    महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आटोक्यात आलेले कोरोनाचे संकट पुन्हा गंभीर होत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनला असताना केंद्र सरकार महाराष्ट्राला कोरोनाच्या लसीकरणासाठी पुरेशा लस मुद्दामहून उपलब्ध करून देत नाही हे दुर्दैवी आहे. दुसरीकडे केंद्र सरकार पाकिस्तानला कोरोना लस पुरवत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पाकिस्तानधार्जिणे सरकार आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

    लॉकडाऊनच्या काळातील वीजबिलांसंदर्भात लोकांच्या मोठ्या तक्रारी आलेल्या होत्या. यातून लोकांना दिलासा देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. घरगुती आणि कमर्शियल विद्युत बिलाबाबतच्या धोरणावर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. ऊर्जा विभागाकडून त्यांनी अहवाल मागवला असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल असे, असेही पटोले यांनी सांगितले.