महाविकास आघडीमधील तीन पक्षांमध्येच कलगीतुरा सुरू, विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा ?

 विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्यात स्पर्धा आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याचं समजलं जात आहे. तर त्यांच्या नावाला विरोधही होत असल्याची चर्चा रंगत आहे. 

    मुंबई: पावसाळी अधिवेशनाला (Monsoon session) जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्द्यावर बरीच चर्चा रंगू लागली आहे. महाविकास आघडीमधील (Mahavikas Aghadi) तीन पक्षांमध्येच कलगीतुरा सुरू झाला असल्याचं समजतंय. विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा यावरून आता राजकीय घडामोडी घडत आहेत.

    विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्यात स्पर्धा आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याचं समजलं जात आहे. तर त्यांच्या नावाला विरोधही होत असल्याची चर्चा रंगत आहे.

    पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री पदावर असताना तेव्हाच्या आघडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत त्यांचे नेहमीच खटके उडत होते. खास करून स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील विसंवाद त्यावेळी चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस उत्सूक नसल्याचं समजलं जात आहे.

    तर दुसरीकडे संग्राम थोपटे विधानसभा अध्यक्ष झाले तर ते आक्रमक असलेल्या विरोधी पक्ष भाजपला किती नियंत्रणात ठेवू शकतील याबाबत शिवसेना संभ्रमात आहे.