महाविकास आघाडीने केंद्रावर आता तरी प्रत्येक गोष्टींचे खापर न फोडता विकास कामांना गती द्यावी; भाजपा प्रदेशाध्यक्षांचा मार्मिक सल्ला

प्रत्येक वेळी केंद्र सरकारवर खापर फोडायचे व जीएसटीच्या थकबाकीचे कारण सांगून आपली जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचे काम नेहमीच महाविकास आघाडी सरकार करीत आहे.

  मुंबई : केंद्रीय अर्थमंत्रालयाने महाराष्ट्राला जीएसटीचे ११ हजार ५१९.३१ कोटी रक्कम वितरित केले आहेत. त्यामुळे आता तरी महाविकास आघाडी सरकारने ही रक्कम कोविडच्या उपाययोजना व राज्यातील विकास कामांना गती देण्यासाठी वापरावी. आणि प्रत्येक गोष्टींचे खापर केंद्र सरकावर फोडणे बंद करावे असा मार्मिक सल्ला भाजापचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

  २७ हजार कोटी थकबाकी

  पाटील म्हणाले की, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटीच्या थकबाकीपोटी २७ हजार कोटी येणे बाकी आहे, त्यामुळे त्याचा परिणाम यंदाचा राज्याच्या अर्थसंकल्पावर होईल असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार नुकताच केला, तर प्रत्येक वेळी केंद्र सरकारवर खापर फोडायचे व जीएसटीच्या थकबाकीचे कारण सांगून आपली जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचे काम नेहमीच महाविकास आघाडी सरकार करीत आहे. परंतु गेल्याच आठवड्यात केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गेल्या चार महिन्यात म्हणजे ऑक्टोबर २०२० पासून राज्य व केंद्र शासित प्रदेशांना जीएसटीच्या पोटी १ लाख कोटी रुपये वितरित केले आहेत, असे स्पष्ट करतानाच पाटील म्हणाले की, अर्थ मंत्रालयाने देशातील २८ राज्ये व तीन केंद्र शासित प्रदेशांना जीएसटी परताव्याची रक्कम वितरित केली आहे. त्यापैकी महाराष्ट्राला मिळालेली जीएसटीची रक्कम ही दुसऱ्या क्रमांकाची आहे.

  सर्वाधिक जीएसटीची रक्कम

  त्याचप्रमाणे २०१९-२० मध्ये केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक जी एस टी परताव्याची रक्कम १९ हजार २३३ कोटी देण्यात आल्याचेही पाटील यांनी निर्दशनास आणून दिले. देशावर कोरोनोचे संकट असतानाही केंद्र सरकारने १ लाख कोटीचा जीएसटीचा परतावा देशातील सर्वच राज्यांना दिला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी जीएसटी थकबाकीचे कारण सांगणाऱ्या महाविकास आघाडीने राज्याचा विकास गतीने करुन दाखवावा व जीएसटी थकबाकीचे कारण देऊन नये असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

  जीएसटीतील नुकसान भरपाईची रक्कम केंद्र सरकारकडून वेळेवर मिळत नाही, त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. राज्यातील कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीसाठी नुकसानग्रस्तांना मदतीसाठी निधी देता येत नाही असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी करत होते. आता तरी त्यांनी अनाठायी टिका थांबवून कामाला लागावे.

  चंद्रकांत पाटील