महाविकास आघाडीची रिक्षा एकत्र राहणार ; भाजपला ‘मनसे’ची साथ MIM लावणार कुणाची वाट?

कोरोनाच्या काळापासून ते आतापर्यंत महाविकास आघाडीची तीनही चाक स्थिर आहेत. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील पाच महानगरपालिकांसह ९६ नगरपालिकांच्या निवडणूका फ्रेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची रिक्षा एकत्र राहून निवडणुकींना सामोर जाणार आणि भाजप-मनसेची युती होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई : नवीन वर्षात निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत. राज्यातील पाच महानगरपालिकांसह ९६ नगरपालिकांच्या निवडणूका फ्रेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. अनेक संकट आणि विरोधकांच्या टीकेचा सामना करत महाविकास आघाडीने आपली वर्षपूर्ती पूर्ण केली आहे. मात्र, या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारची अग्नीपरीक्षा असणार आहे. त्याला कारण म्हणजे भाजप, मनसे आणि एमआयएमचे तगडे आव्हान. एमआयएम भाजपसोबत जाण्याची शक्यता नाहीच…मात्र, भाजपला मनसेची साथ मिळू शकते. परंतु, एमआयएमची भूमिकाही महाविकास आघाडी सरकारसाठी आव्हान ठरू शकते. महाविकास आघाडीची रिक्षा एकत्र राहून निवडणुकींना सामोर जाणार आणि भाजप-मनसेची युती होणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महानगरपालिकांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहेत. याशिवाय, राज्यातील ९६ नगरपालिकांसाठीही फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात निवडणुका पार पडतील. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे राज्यात फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुध्द भाजप, मनसे, एमआयएम आणि अन्य पक्ष असा सामना अनुभवायला मिळू शकतो.

नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकासआघाडीने भाजपला धूळ चारली होती. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीसाठी राज्यभरात अनुकूल वातावरण असल्याची चिन्हे आहेत. याचाच फायदा घेत फेब्रुवारी महिन्यात बड्या महानगरपालिकांच्या निवडणुका उरकण्याचे महाविकासच्या नेत्यांनी ठरवले असावे, असे राजकीय निरिक्षकांचे मत आहे.