उस्मानाबादच्या वसंतदादा सहकारी बँकेचे लायसन्स रद्द; कोणतेही व्यवहार बँकेला करता येणार नाहीत

आणखी एका सहकारी बँकेवर आरबीआयने कारावाईचा बडगा उगारला आहे. उस्मानाबादच्या वसंतदादा सहकारी बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या कारावाईमुळे खातेदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

मुंबई : आणखी एका सहकारी बँकेवर आरबीआयने कारावाईचा बडगा उगारला आहे. उस्मानाबादच्या वसंतदादा सहकारी बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या कारावाईमुळे खातेदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

आरबीआयच्या कारवाईमुळे बँकेला आजपासून कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

रिझर्व्ह बँकेने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे वसंतदादा सहकारी बँकेवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. ११ जानेवारीपासून या बँकेचा परवाना रद्द करण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले.

बँकेची सध्याची वित्तीय स्थिती पाहता ही बँक ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात असमर्थ आहे, असं एक प्रमुख कारण आरबीआयने दिलं आहे. २०१७ मध्ये या बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध घालूनही बँकेने वित्तीय स्थिती सुधारली नाही. त्यामुळे बँकेवर कारवाई करण्यात आल्याचेही आरबीआयने या पत्रकात म्हंटले आहे.

या बँकेत हजारो ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेचा परवाना रद्द झाल्याने आणि लिक्विडेशनची प्रक्रिया सुरू झाल्याने बँके डिपॉझिटर्सला त्यांचे पैसे देण्याची प्रक्रिया सुरू होईल, असंही आरबीआयने म्हटलं आहे.

कोणत्याही बँकेच्या लिक्विडेशनवर बँकेच्या खातेदारांचे ५ लाख रुपयांपर्यंतची जमा सुरक्षित असते. याचा अर्थ बँकेत तुमचे कितीही पैसे जमा असले तरी तुम्हाला ५ लाखांपर्यतची तुमची रक्कम परत मिळणार आहे. डिआयसीजीसीकडून पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम सुरक्षित राहण्याची हमी मिळते. वसंतदादा नागरी सहकारी बँकेतील 99 टक्क्याहून अधिक खातेदारांना त्यांची जमा रक्कम परत देण्यात येणार आहे.