मलेरिया नियंत्रणात पण इतर आजाराच्या रुग्णांची संख्या जैसे थे

मुंबई : ऑगस्टमध्ये मलेरियाचे(maleria) रुग्ण(patients) मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोरोनासोबत मलेरियाचे आव्हानही मुंबई पालिकेसमोर उभे ठाकले आहे. परंतु योग्य ती उपाययोजना करत पालिकेने पावसातील साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यात यश मिळवले आहे. ऑगस्टमध्ये मलेरियाचे ११३७ रुग्ण सापडले होते. त्या तुलनेत सप्टेंबरमध्ये ३१७ रुग्ण सापडले असून रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले होते. एकीकडे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पालिका प्रशासनाला साथीच्या आजारांचाही सामना कराव लागत आहे. ऑगस्टमध्ये मुंबईमध्ये मलेरियाचे १ हजार १३७, गॅस्ट्रो ५३, लेप्टोचे ४५, हेपटाईटीस १० आणि डेंग्यूचे १० रुग्ण सापडले होते. पालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या सप्टेंबरपर्यंतच्या अहवालामध्ये मुंबईमध्ये मलेरियाचे ३१७ रुग्ण सापडले, तर गॅस्ट्रोचे ४९, लेप्टो २४, हेपेटायटीस ८, डेंग्यू ५ आणि स्वाईन फ्ल्यूचा अवघा एक रुग्ण सापडला आहे. यावरून ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मात्र गॅस्ट्रो, लेप्टो, हेपेटाईटीस, डेंग्यू या आजारांच्या रुग्णांची संख्या ‘जैसे थे’ दिसून येत आहे. ऑगस्टमध्ये मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने पालिकेसमोर मलेरियाचे आव्हान निर्माण झाले होते. मात्र पालिकेने योग्य उपाययोजना करत मलेरियाचे वाढते रुग्ण नियंत्रण आणण्यात यश मिळवले आहे.

पालिका रुग्णालये सज्ज
महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये पावसाळी आजारांसाठी दीड हजारांवर बेड्सची सोय करण्यात आली आहे. मलेरिया, डेंग्यूचे डास होऊ नये म्हणून पालिकेकडून फवारणी केली जात आहे. पण, नागरिकांनी पाणी साचू देऊ नये. ताप, डोकेदुखी, उलटी, थकवा अशी काही लक्षणे आढळली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत.

आजार        जुलै       ऑगस्ट     सप्टेंबर
मलेरिया       ८७२      ११३७       ३१७
लेप्टो            १४          ४५         २४
एच१एन१       ०             १           १
गॅस्ट्रो            ५३          ५३         ४९
हेपेटाईटीस      १          १०           ८
डेंग्यू              ११          १०           ५

कोरोनामुळे लोक बाहेर पडत नसल्याने मलेरिया, डेंग्यू, लेप्टो सारख्या आजारांचा फारसा प्रसार झाला नाही. तसेच पालिकेकडून योग्य उपाययोजना आणि काळजी घेण्यात येत असल्याने साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

- डॉ. रमेश भारमल, संचालक, प्रमुख पालिका रुग्णालये