ममता बॅनर्जीं यांनी देशात भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व करावे, स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांच्या ट्विटने मविआमध्ये संभ्रम!

जखमी वाघिणीच्या पंजाने चौकीदार झाला घायाळ. पश्चिम बंगालमधील निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल ममतादीदींचे अभिनंदन! त्यांनी आता देशातील भाजपविरोधी आघाडीचेही नेतृत्व करावे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ट्विट केलंय.

    मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार  यांनी पश्चिम बंगालमधील विजयासाठी ममता बॅनर्जींचे अभिनंदन केले आहे. आता देशातील भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व दिदींनी करावे, अशी अपेक्षाही शेट्टी यांनी केली आहे. मात्र शरद पवार यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या राज्यातील महाविकास आघाडीत त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

    वाघिणीच्या पंजाने चौकीदार घायाळ
    त्यांनी व्टिट करत म्हटले आहे की, जखमी वाघिणीच्या पंजाने चौकीदार झाला घायाळ. पश्चिम बंगालमधील निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल ममतादीदींचे अभिनंदन! त्यांनी आता देशातील भाजपविरोधी आघाडीचेही नेतृत्व करावे,’ असे व्टिटमध्ये शेट्टी यांनी म्हटले आहे.

    विधानाने बिघाडी होण्याची शक्यता
    शेट्टी यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सध्या महाविकास आघाडी सोबत जुळवून घेतले आहे, त्यानंतर त्यांच्या नावाची शिफारस राज्य सरकारने राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत केली आहे. केंद्रात युपीएचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे असे वक्तव्य अलिकडेच शिवसेनेच्या खा. संजय राऊत यांनी केल्यावर त्याला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी आक्षेप घेतला होता. त्यामुळे आता शेट्टी यांच्या नव्या आघाडीच्या नेतृत्वाबाबतच्या विधानाने बिघाडी होण्याची शक्यताच जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.