खत दरवाढीला मनमोहनसिंग आणि शरद पवार कारणीभूत; चंद्रकांत पाटलांचा आरोप

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खतांच्या किमती वाढण्यास मनमोहनसिंग आणि शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, डीएपी खतांच्या बाबतीत दरवाढीची समस्या निर्माण होण्यास तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे सरकारच कारणीभूत आहे.

    मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खतांच्या किमती वाढण्यास मनमोहनसिंग आणि शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, डीएपी खतांच्या बाबतीत दरवाढीची समस्या निर्माण होण्यास तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे सरकारच कारणीभूत आहे.

    काँग्रेसच्या नेतृत्वाखालील त्या सरकारने ‘न्यूट्रियंट बेस्ड सबसिडी पॉलिसी’ नावाचे धोरण फॉस्फॅटिक आणि पोटॅशिक खतांसाठी 1 एप्रिल 2010 पासून लागू केले. त्यानुसार केंद्र सरकारने डीएपीसारख्या खतांसाठीचे अनुदान मर्यादित ठेवावे आणि कंपन्यांना खतांच्या विक्री किंमती ठरविण्याची मोकळीक द्यावे असे धोरण लागू झाले. परिणामी कंपन्यांना दरवाढीला मोकळे रान मिळाले.

    खत कंपन्यांच्या नफेखोरीबाबत संसदेच्या रसायने आणि खतांविषयीच्या स्थायी समितीने 2019-20 च्या अहवालात चिंता व्यक्त केली होती. शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना आणि काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात झालेला हा बदल विसरून दोन्ही पक्षांचे नेते मोदी सरकारवर टीका करत आहेत, हे विशेष आहे असे पाटील यानी म्हटले आहे.

    पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या दराने डीएपी रासायनिक खत उपलब्ध करून दिले आहे. दरवाढीबद्दल तक्रार करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता प्रामाणिकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले पाहिजेत, असे आवाहन पाटील यांनी केले. आंतरराष्ट्रीय बाजारात फॉस्फॅरिक ॲसिड, अमोनिया आदी रसायनांच्या किंमती वाढल्याने खत उत्पादक कंपन्यांनी डीएपी खताच्या किंमतीत वाढ केली. त्याची दखल घेऊन पंतप्रधानांनी या खतासाठीचे अनुदान 140 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. परिणामी शेतकऱ्यांना या खताच्या गोण्या गेल्या वर्षीच्याच भावाने मिळणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.