Mansukh Hiren Death Case : क्राईम ब्रांचच्या पोलीस निरीक्षक सुनील मानेची एटीएसकडून चौकशी

मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना यासंबंधी दावा केला होता. आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून फोन आला होता, आणि चौकशीसाठी बोलावलं होतं, असं त्यांनी सांगितलं होतं.

    मुंबई: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची महाराष्ट्र एटीएसकडून कसून चौकशी केली जात आहे. एटीएसने चौकशीसाठी कांदिवली क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांना बोलावलं आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये मानेंची चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी एटीएसच्या हाती महत्त्वाची लीड मिळाली आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा ताबा घेण्यासाठी एटीएस कोर्टात प्रयत्न करणार आहे.

    “कांदिवली क्राईम ब्रांचमधून चौकशीचा फोन”
    मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना यासंबंधी दावा केला होता. आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून फोन आला होता, आणि चौकशीसाठी बोलावलं होतं, असं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करण्यास नकार देणारे निलंबित API सचिन वाझे यांचा खेळ आता संपण्याची चिन्हे आहेत. कारण आता सचिन वाझे प्रमुख असलेल्या गुप्तवार्ता विभागातील अधिकारी रियाझ काझी यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    रियाझ काझी हे सचिन वाझे यांचे निकटचे सहकारी होते. सचिन वाझे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या केलेल्या तपासात ते सहभागी होते. याशिवाय, सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून रियाझ काझी यांनीच गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करुन आणल्याचा आरोप आहे. याशिवाय, सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही फूटेजही रियाझ काझी यांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे रियाझ काझी यांना अंबानींच्या घराबाहेर ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील जवळपास सर्व घटनाक्रम माहिती असल्याची चिन्हं आहेत. त्यामुळे ते माफीचा साक्षीदार झाल्यास सचिन वाझे यांच्या कृत्यांचा पर्दाफाश होणार आहे.