इतर समाजाप्रमाणेच मराठा समाजालाही आरक्षण मिळालेच पाहिजे : उदयन राजे भोसले

गायकवाड कमिशनचा रिपोर्ट आपण पाहिला तर ७० टक्के समाज हा मागास आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

    मुंबई : आरक्षण देण्याची सरकारची इच्छाशक्तीच नाही. ७० टक्के मराठा समाज अजूनही मागास असल्याची माहिती मराठा समाज आरक्षण प्रकरणी आयोजित पत्रकार परिषदेत भाजप नेते उदयन राजे भोसले यांनी आज दिली. तामिळनाडूत ही गोष्ट शक्य होऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

    सारथी सारखे प्रयत्न महाराष्ट्रात का होताना दिसत नाही. गायकवाड कमिशन हे ज्युडिशियल कमिशन होतं. त्यांनी योग्य पद्धतीने अभ्यास केला. दोन्ही सभागृहात कायदा पास झाला. गायकवाड कमिशनचा रिपोर्ट आपण पाहिला तर ७० टक्के समाज हा मागास आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

    ११ राज्यातल्या लोकांनी जर आरक्षणाचा निर्णय घेतला आहे तर महाराष्ट्रात इच्छाशक्तीचा अभाव आहे असंच म्हणावं लागेल. जेव्हा २१५० उमेदवारांची निवड होते पण त्यांची नियुक्ती होत नाही. लोकांवर होणारा अन्याय थांबायला हवा. सारथीसारखी संस्था आज बंद पडण्याच्या मार्गावर आहे. एक श्वेतपत्रिका सरकारने जाहीर कारावी असंही यावेळी उदयन राजे यांनी नमूद केलं.