ओबीसीच्या आरक्षणात वाटेकरी स्विकारला जाणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला इशारा

कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणात वाटेकरी स्विकारला जाणार नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावाल, तर खबरदार.. आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाची लढाई आता न्यायालयात सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणीही काही नेत्यांकडून होत आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ओबीसीच्या आरक्षणात वाटेकरी स्विकारला जाणार नाही असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी बैठकीत फडणवीस बोलत होते.

मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, असे पत्रच करमाळ्याचे राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार संजय शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. यावरुन फडणवीस यांनी महाविकास आघडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

सरकारमधील काही आमदार व मंत्री ओसीबीच्या आरक्षणात वाटेकरी होण्यासाठी पत्र देतात, आणि यांचेच काही मंत्री त्याचा विरोध करतात. ओबीसीचं आरक्षण आता घटनात्मक झालंय. मग, या आरक्षणासंदर्भात सरकार प्रश्नचिन्ह कसं काय उभा करू शकतं? असा सवालच फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणात वाटेकरी स्विकारला जाणार नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावाल, तर खबरदार.. आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला.

ओसीबीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असा ठरावच मंत्रिमंडळात करा अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्याचवेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला संरक्षण देण्याचं कलमही या कायद्यात घातल असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सूचीत केले.