Marine Fisheries Sailing Training in Mumbai
Mumbai, India

मुंबई : वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन विषयाच्या १२५ व्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२० आहे.

मत्स्यव्यवसाय आणि सागरी मासेमारीचा विकास आणि विस्तार होण्यासाठी मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना सहा महिन्याचे प्रशिक्षण शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात दिले जाते. त्याअनुषंगाने २०२० -२१ या वर्षातील,  १ जानेवारी ते ३० जून २०२१ या सहा महिन्याच्या कालावधीत सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन,सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुक प्रशिक्षणार्थीनी विहित नमुना अर्ज आवश्यक कागदपत्रांसह शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा मुंबई ६१ या पत्त्यावर १६ डिसेंबर २०२० पर्यत सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.